Saturday, July 13, 2024
Homeक्रीडानेतृत्वबदल, फलंदाजांच्या अपयशामुळे चेन्नई एक्स्प्रेसचा वेग हरवला!

नेतृत्वबदल, फलंदाजांच्या अपयशामुळे चेन्नई एक्स्प्रेसचा वेग हरवला!

ज्योत्स्ना कोट-बाबडे

मुंबई : गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक राहिला. चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जने सलग ४ सामने गमावल्यानंतर आरसीबीविरुद्ध ५व्या सामन्यात पहिला विजय मिळवला. एकूण १४ पैकी १० सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. चेन्नईसाठी कोणत्याही आयपीएल हंगामातील ही सर्वात खराब कामगिरी आहे. हंगाम सुरू होतानाच अचानक केलेला कर्णधारपदावरील बदल चेन्नईच्या विरोधात गेला. या आयपीएल मोसमाच्या सुरुवातीला चेन्नईने एमएस धोनीऐवजी रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले होते; परंतु हा निर्णय संघाला फारसा रुचला नाही आणि त्यांना सलग ४ सामन्यांत पराभव पत्करावा लागला.

जडेजा अधिकृतपणे कर्णधार झाला असला, तरी धोनीच मैदानावर कर्णधार झालेला दिसून आला. कर्णधारपद न पेलवल्याने तसेच खेळावर परिणाम झाल्याने रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडले. अन् कमान पुन्हा धोनीकडे आली. भरवशाचा फलंदाज फाफ डु प्लेसिसला रिटेन न करून चेन्नईने मोठी चूक केली. या मोसमात त्याची उणीव त्यांना जाणवत आहे. डू प्लेसिस हा गेल्या अनेक सत्रांपासून चेन्नईच्या फलंदाजीचा एक मजबूत भाग होता, पण चेन्नईने त्याला या मोसमासाठी सोडले आणि आरसीबीने त्याला ७ कोटी रुपयांना विकत घेतले.

चहरला चेन्नईने १४ कोटी रुपयांना खरेदी केले. पण त्याचा फायदा त्यांना मिळू शकला नाही. या हंगामात दीपक चहरची कमतरता चेन्नई सुपरकिंग्जला सर्वात जास्त जाणवत आहे. दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने खेळू न शकलेला चहर नंतर पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला. चहरच्या गैरहजेरीत चेन्नईचा संघ पॉवरप्ले ओव्हर्समध्ये विकेट्स घेण्यासाठी धडपडताना पहायला मिळाला. तसेच चहर हा खालच्या क्रमवारीत झटपट धावा करूनही संघाला मदत करत आला आहे.

पहिल्या सीझनपासूनच सुरेश रैना हा चेन्नईचा अविभाज्य भाग राहिला आहे. पण या आयपीएल लिलावात चेन्नईसह कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नाही. रैनाच्या अनुपस्थितीचा परिणाम चेन्नईच्या फलंदाजीवर स्पष्टपणे दिसून आला. आयपीएलमध्ये ५५०० हून अधिक धावा करणाऱ्या रैनाच्या अनुपस्थितीत चेन्नईच्या मधल्या फळीत तसे कौशल्य दिसून आले नाही. संकटमोचक सुरेश रैना नसल्याचा फटका चेन्नईला नक्कीच बसला. ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांसारख्या स्टार फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनेही यंदाच्या मोसमात चेन्नईच्या अडचणीत भर घातली. ऋतुराज आणि उथप्पा या सलामीवीरांच्या कामगिरीत सातत्य नसल्याचा परिणाम चेन्नईच्या सलामीवर दिसून आला.

गेल्या दोन हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या ऋतुराजने यंदाच्या मोसमात नाराज केले. या मोसमात सुरुवातीच्या ५ सामन्यांत अनुक्रमे ०,१,१,१६ आणि १७ धावा केल्या आहेत. त्याचवेळी आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ८८ धावा करून विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या उथप्पाने त्या सामन्याव्यतिरिक्त पहिल्या पाच सामन्यात अनुक्रमे ५०, १२, १५ आणि २८ अशा धावा केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -