Monday, September 15, 2025

मेट्रो पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

मेट्रो पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

ठाणे (हिं.स) : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, वेदांत हॉस्पिटल, घोडबंदर रोड, ओवळा सिग्नल या ठिकाणी मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे २९ मेपर्यंत रात्री ११ ते सकाळी ४ वाजेच्या काळात ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्यामुळे या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविली आहे.

मुंबई मेट्रोलाइन - ४ चे कासारवडवली ते गायमुखपर्यंत काम चालू आहे. या कामाच्या दरम्यान मेट्रो - ४ च्या पिलर क्र. ६१ ते ६४ विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, घोडबंदर रोड पिलर क्र. २४ ते २६ वेदांत ६१ हॉस्पिटल घोडबंदर रोड ठाणे आणि पिलर ४४ ते ४५ ओवळा सिग्नल या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यावेळी ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी

खालीलप्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून मुंबई-ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेजवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. मुंबई-ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. दरम्यान मुंब्रा-कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाण्याच्या सर्व जड-अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

मुंब्रा-कळवाकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे जातील. नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे, तर नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिजखालून जातील.

वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment