रमेश तांबे
खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट. डोंगराच्या कुशीत होतं एक गाव. गावाला नव्हतं काहीच नाव. घनदाट झाडी आणि भलमोठी नदी, गावात होती देवळांची गर्दी! तुम्हाला वाटेल, ही काय गोष्ट! गावासारखं गाव, त्यात कसली गंमत? ऐका तर खरं…!
गावातली घरं होती खूप खूप मोठी, घरांना होती दारं छोटी. आकाशाएवढी घरांची उंची, प्रत्येक घराला एक एक गच्ची. उंच उंच घरं पाहून मान दुखायची. गावात फिरताना माणसं नाही दिसायची!
गावातली माणसं खूप खूप बुटकी, अंगठ्याएवढी होती त्यांची उंची. बुटके पुरुष, बुटक्या बायका, बुटकी मुले, बुटक्याच मुली. बुटक्यांची मुलं मैदानात खेळायची, भल्या मोठ्या नदीत सहज पोहायची!
बुटक्यांची शाळा केवढी मोठी, मुलांना आवडायच्या भुताच्या गोष्टी. मुलांच्या पाठीवर छोटेसे दप्तर, त्यात पुस्तकं छोटी सत्तर. बुटक्यांची मुलं खूप खूप शहाणी, शाळेत गायची गोड गोड गाणी! बुटक्यांची होती गंमत न्यारी, प्रत्येक गोष्ट किती किती भारी. इवलेसे कपडे, इवल्याशा चपला, प्रत्येकाच्या हातात छोटासा भाला! मुंग्यांसारखे बुटके रांगेत चालायचे, जेवताना मात्र काही नाही बोलायचे. दिवसभर बुटके खूप काम करायचे, पण काय काम करतात, तेच नाही कळायचे. बुटक्यांचा होता एक बुटका राजा, बुटक्या राजाची होती बुटकीच राणी! सगळेजण राजाला खूप मान द्यायचे. राजाच्या पुढे सगळे गाणं म्हणायचे…
‘बुटके लोक बुटका राजा
उंच त्यांची घरे
बुटक्या राणीसोबत राजा
जिकडे तिकडे फिरे’
सगळं छान छान होतं. राजाचं गावावर खूप प्रेम होतं. बुटक्यांच्या गावाचा एकच होता कायदा, ‘उंच घरं कशी बांधली सांगायचं नाही कुणाला, हाच होता वायदा.’
एके दिवशी बुटक्यांच्या गावात एक माणूस गेला. उंच उंच घरं पाहून तो अगदी वेडापिसा झाला. कुणी बांधली, कशी बांधली एवढी मोठी घरं? मग एका बुटक्यालाच विचारला त्यानं मनातला प्रश्न! तेवढ्यात देवळातल्या घंटा जोरजोरात वाजल्या. बुटक्यांच्या फौजा चौकात जमल्या. प्रत्येकाच्या हातात होते छोटे-छोटे बाण, छोट्या-छोट्या तलवारीची कमरेला म्यान! त्या गावाबाहेरच्या माणसाला बुटक्यांनी गराडा घातला. मग एकाच वेळी सगळ्यांनी त्याला मार मार मारला. लांबलचक धाग्यांनी करकचून बांधला आणि समुद्रकिनारी टाकून दिला.
पाण्यात भिजल्यावर तो माणूस जागा झाला. अंगावरचे धागे त्याने सहज तोडले. घुसलेले छोटे छोटे बाण उपटून टाकले. आजूबाजूला पाहतो, तर काय, सगळी माणसं त्याच्यासारखीच उंचपुरी होती. काल आपण कुठे होतो अन् काय पाहिले काहीच त्याला आठवेना! आपण इथे कसे आलो, हेच त्याला कळेना!
बुटक्यांचं गाव त्याला आठवेना,
अन् पुढे काय लिहावे,
ते मलाही कळेना!