डॉ. विजया वाड
विश्वंभर ऊर्फ विसू बॉसचा विशेष लाडका. विसू बॉसच्या आवडी-निवडीवर बारीक लक्ष ठेवून होता. विसूनं ३ प्रकार आत्मसात केले होते. खाणे, पिणे, नि आवड-निवड. बॉसला निळा रंग आवडतो, बॉसला पुरणपोळी आवडते, बॉसला रुआफजा खासच वाटतं. बस् क्या? और क्या माँगता? पुपो, रुआफजा नि निळे शर्ट.
खत्तम! बात बन जाएगी! विसूचा विश्वास खात्रीत बदलला. जेव्हा बॉस म्हणाली, “मी तुमचे प्रमोशन लिस्टमध्ये आग्रक्रमाने करते आहे.” कृतकृत्य वाटलं विसूला.
मारुतीच्या फेऱ्या कामी आल्या.
पुपो डब्यात… ऐवजी हाटीत आली… नि रुआफजा पोटात जाण्याआधीच गारेगार झालं.
“आज आपण बरोबर मारुतीला जाऊया.” बॉस म्हणाली.
“ओके मॅम.” विसू आनंदलहरी लपवीत,
मान्यता देऊन वदला. वास्तविक विसू ठाण्याला राहायचा. बॉस दादरला शारदाश्रमात. पण पेढ्या मारुती पुण्यात म्हणजे! पेढ्या मारुतीला चक्कर लावायला विसू एका पायावर तयार होता. बॉसने दादरचा मारुती निवडला तसा विसू आनंदला.
“माझा आवडता मारुतीराया कबुतरखान्याजवळ दादरला आहे.”
“अरे वा! माझा पण!”
“क्कायं?” “येशील दादरला?” बॉसनं विचारलं.
“बॉस! ये भी कोई पूछनेकी बात है? आजच ताबडतोब जाऊ.”
“मी हाफ डे टाकतो. तुम्ही हेड ऑफिसचे
काम काढा.”
“चतुर आहेस.” बॉस म्हणाली. “आज दुपारी नक्की!”
विश्वंभर कन्फर्म म्हणाला. पुढचे प्लॅनिंग करायला वेळ नको होता. घाई होती.
बॉस सुंदर होती. चपलमती होती. एक्स्ट्रा फॅटही नव्हती. फक्त एकोणतीस वर्षांची! विसू बत्तीस!
वयही मॅचिंग मॅचिंग. आज विचारूनच टाकू. “मग ठरलं? मारुतीराया अॅट दादर. कबुतरखाना.”
“ओ येस्.”
“थँक्यू कमलिनी.”
“शर्ट छान आहे.”
“धन्यता वाटते.” विसू म्हणाला. नेमका निळा शर्ट! ओ गॉड.
गॉड ब्लेस मी विथ बॉस्ज फेवर. विसू विनवणी करीत देवाला आळवू लागला. अशा वेळी देवच आठवतो. प्रेमिकांना! किनई? संध्याकाळ जवळ सरकली. विसूने ठाण्याला फोन लावला.
“आई, मी आज उशिरा घरी येईन.”
“का रे? विसू?”
“अगं दादरला जातो आहे परस्पर.”
“का रे? विसू?”
“आई, मी बत्तीस वर्षांचा आहे.”
“पण मला तू लेकरू म्हणून लहानच.”
“हो ते असंच म्हणा!”
“मारुतीरायाला साकडं घातलंय रे विसू.”
“आई, मी दादरला कबुतरखान्या जवळ जे मंदिर आहे नं मारुतीचं….”
“अरे तिथे जत्राच देवांची! मारुती, गणपती, देवी अंबाबाई…”
“कमलिनी, आजचाच मुहूर्त छान.”
“मला पण कसंतरी वाटतंय. शुभस्य शीघ्रम.”
बॉसचे संकेत सूचक शब्द आले असंच वाटलं विसूला.
तो प्रमुदित होत पुढे पुढे करीत म्हणाला.
“कमलिनी, ठऱ्या… नक्की ठऱ्या. दर्शनमात्रे
मन रमता गमता… मारुती ताता!” आरतीच्या सुरात विसू म्हणाला.
“ओके विसू.” बॉस ‘विसू’ म्हणाली? चक्क विसू? शॉर्टफॉर्म… ऑफिस अवर्स न संपता एकदाचे आटपले.
“आज टॅक्सीच करूया.” विसू म्हणाला.
“नको बै. हायवेवर गर्दी फार.”
“मग लोकल?” विसूचा चेहरा इतका पडला की कमू म्हणाली, “ठीक आहे. टॅक्सी करूया.”
आता विसू उडी मारायचीच बाकी होता.
टॅक्सीने दादर गाठले. बीबी दादर! थेट मारुती मंदिर! अगदी कबुतरखाना…
“किती उशीर?” एक देखणा तरुण? हा कोण? पचकला मध्ये.
“माझा वुड बी. कमलाकर दिघे.” कमलिनी लाजली.
विसूच्या पोटात खड्डा पडला.
खोल खोल खड्डा. निराशा! घोर निराशा!
“हे कोण?” त्या तरुणाने रागावून विचारले.
“अरे, माझे कलीग आहेत. हनुमान भक्त आहेत.”
बॉस सहज होती.
“हे पाहा, ते कोणीही असोत बॉससारखी वाग. पीपल टेक यू फॉर ग्रँटेड.” कमलिनी त्या दिघेसोबत विसरूनच गेली की, ‘विसू’ बरोबर आहे. बॉस ‘बॉस’ होती हैं बाबा!