मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील करकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात २ रुपये ८ पैसे आणि डिझेलच्या दरात १ रुपये ४४ पैशांची कपात केली आहे. तत्पूर्वी शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात ८ रुपयांनी तर डिझेलच्या दरात ६ रुपयांनी कपात केली.
इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला होता. त्यामुळे पेट्रोल साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त आहे. यानंतर आता राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी केला आहे.
राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर
व्हॅट कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल १०९ रुपये २७ पैसे प्रतिलिटर दराने तर डिझेल प्रति लिटर ९५ रुपये ८४ पैसे उपलब्ध होणार आहे.