मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलमध्ये शनिवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. हा एक सामना दिल्ली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या दोन्ही संघांचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग निश्चित करेल. म्हणजेच हा सामना दिल्लीसाठी उपांत्यपूर्व फेरीसारखा असेल. कर्णधार ऋषभ पंतच्या संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, तर पाचवेळच्या चॅम्पियन्स मुंबई इंडियन्ससाठी मोसमाची सुरुवात पराभवाने झाली असली तरी हंगामातील शेवट त्यांना विजयाने करायचा आहे. दिल्लीचे भवितव्य आता मुंबईच्या हातात आहे, त्यामुळे जवळजवळ ‘उपांत्यपूर्व’ सामन्यासारख्या असलेल्या या ‘करो या मरो’च्या लढाईत कॅपिटल्स हे इंडियन्सविरुद्ध सर्व आघाड्यांवर चमकदार कामगिरी नोंदविण्याचा प्रयत्न करतील.
मुंबई इंडियन्ससाठी हा संपूर्ण हंगाम निराशाजनक ठरला असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. कर्णधार रोहित शर्माने शेवटच्या सामन्यात काही नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे संकेत दिले आहेत. रोहितने जर अद्याप एकदाही संधी न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल व राहुल बुद्धी या नवोदितांना संधी देण्यासाठी काही अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली, तर त्याचा फायदा दिल्लीला होणार आहे. त्यामुळे बंगळूरुचे टेन्शन वाढले आहे. अखेरीस मास्टर ब्लास्टर तेंडुलकरचा मुलगा अर्जुन या सामन्यात पदार्पण करू शकतो आणि त्याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
मुंबईसाठी विजय तितका महत्त्वाचा नसला तरी दिल्ली कॅपिटल्सला -०.२५३ चा प्लेऑफ नेट रनरेट गाठण्यासाठी मुंबईवर मात करणे अतिआवश्यक आहे. त्यासाठी दिल्ली कॅपिटल्सची भिस्त डेविड वॉर्नर (४२७ धावा), कर्णधार पंत, मिचेल मार्श, रोव्हमन पॉवेल या फलंदाजांवर असेल, तर गोलंदाजीत फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (२० बळी), अक्षर पटेल, ठाकूर आणि ललीत यादव यांच्यावर असेल. तसेच महत्त्वाचे म्हणजे दिल्लीसाठी चिंतेची बाब म्हणजे दुखापती, कोरोनाचा शिरकाव यामुळे अजूनही त्यांना प्लेइंग इलेव्हनचे अपेक्षित असलेले संयोजन मिळालेले नाहीये. अशा सतत होणाऱ्या बदलांमुळेच त्यांच्या विजयात सातत्य दिसून येत नाही. अशात या सर्व आघाड्यांवर लढत दिल्लीला आजचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, हे निश्चित.
बंगळूरुचा असेल मुंबईला सपोर्ट…!
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्याही मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या या सामन्यावर नजरा असतील. दिल्ली जिंकली, तर आरसीबीचा प्रवास थांबेल आणि मुंबई जिंकली, तर बंगळूरु अंतिम-४ मध्ये पोहोचेल. त्यामुळे या सामन्यात मुंबईने जिंकावे म्हणून बंगळूरुचे समर्थकदेखील देव पाण्यात ठेवतील. त्यात कोहलीनेही या सामन्यात रोहितच्या संघाला सपोर्ट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी तो स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकतो, असे संकेत त्याने दिले आहेत. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधीचा एक व्हीडिओ शेअर झाला आहे. यामध्ये विराट कोहली कर्णधार फाफ डू प्लेसिसशी बोलताना दिसत आहे. कोहली म्हणाला, “आता आमच्याकडे २ दिवस आहेत. आम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊ आणि मुंबई इंडियन्सलाही सपोर्ट करू. मुंबईसाठी आमचे आणखी दोन समर्थक आहेत. फक्त दोन नाही, तर मला वाटते अजून २५ समर्थक आहेत. कदाचित तुम्ही आम्हाला स्टेडियममध्येही पाहू शकाल.” असे त्याने त्यात म्हटले आहे.
ठिकाण : वानखेडे स्टेडियम वेळ : रात्री ७.३० वाजता