
अतुल जाधव
ठाणे : जिल्ह्यातील आदिवासी भागातील आदिवासी बांधवांना हक्काचे रोजगाराचे साधन मिळवून देणारा रानमेवा म्हणजे डोंगराची काळी मैना सध्या ठाण्याच्या बाजारपेठेत विक्रीला आली आहे. नागरिकांकडून मागणी देखील उत्तम असल्याने आदिवासी सुखावले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हंगामातील करवंद म्हणजे डोंगराची काळी मैना...
सलग दोन वर्षांमुळे कोरोनामुळे आदिवासींना करवंद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध न झाल्याने आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काच्या रोजगारापासून वंचित राहावे लागले होते; परंतु यंदा डोंगराची काळी मैना चांगलीच बहरली आहे.
ठाणे शहरातील स्टेशन रोड, जांभळी नाका नौपाडा परिसरात आदिवासी बांधव टोपल्यामधून छोटी रसाळ करवंद विक्री करताना दिसून येत आहेत. भर उन्हात करवंदांची वाटी म्हणजे पळसाच्या पानांचा द्रोण घेऊन करवंद घ्या, काळी मैना घ्या, असे ओरडून लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. ठाणे-पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरातून उन्हातानाची तमा न बाळगता हे दरवर्षी मे महिन्यात ठाणे शहरात करवंद विकण्यासाठी येत असतात जवळ बांधून आणलेली भाकरी आणि चटणी खाऊन मिळेल त्या ठिकाणी सावलीत बसून ते करवंदाची विक्री करतात.
करवंद विक्रीतून दोन पैसे मिळून संसाराला थोडाफार हातभार मिळतो, मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे करवंद जाळीतून काढलीच नाहीत. त्यामुळे त्यांचा हक्काचा रोजगार बुडाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली; परंतु यंदा मात्र ग्राहकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. विक्री चांगली होत असल्याने दोन वर्षांनंतर प्रथमच त्यांच्या चेहेऱ्यावर हसू फुललेले दिसत आहे.
खाणकाम नागरिकरणामुळे करवंद नामशेष होणार...
आदिवासी बांधवांबरोबर सवांद साधला असता करवंद माळरानावर डोंगर कपारीत नैसर्गिक पद्धतीने बहरतात अशी माहिती दिली; परंतु अलीकडे करवंदे पूर्वीच्या तुलनेत कमी मिळतात, असे सांगितले. विविध कारणांसाठी करवंदाच्या झुडपाची होणारी तोड व जंगलांना लागणारे वनवे यामुळे करवंदे नष्ट होत चालली आहेत.
शासनाचे उदासीन धोरण
राज्य शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका करवंदाला बसत आहे. ठाण्याच्या ग्रामीण आदिवासी पट्ट्यात करवंद, जांभूळ यावर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे प्रक्रिया उद्योग नसल्याने आदिवासी बांधवांना ठरावीक काळानंतर उद्योगासाठी इतरत्र स्थलांतर करावे लागते. या संदर्भात माहिती घेतली असता योजना आहेत; परंतु त्या फक्त कागदावर असल्याचे दिसून येते.