Saturday, July 13, 2024
Homeमहाराष्ट्रबालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी : लीना बनसोड

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी : लीना बनसोड

महिला बालकल्याण विभाग व युनिसेफची एकत्रित बैठक

नाशिक (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येत काम करावे, अंगणवाडी सेविकांनी किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावे व महिला बचत गटांच्या मासिक सभा, ग्रामसभांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन करत लोकसहभागातून बालविवाह थांबवण्यासह बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन नाशिक जिल्या परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांनी केले एका बैठकीत केले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आज महिला व बालकल्याण विभाग आणि युनिसेफ (UNICEF) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालकल्याण विभागाच्या एक मूठ पोषण कार्यक्रम, नवजात बालकांची संख्या व कमी वजनाची बालके, सर्वसाधारण वजनाची बालके त्याचबरोबर बाल आधार नोंदणी यासंदर्भात आढावा घेत या सर्वाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावमध्ये साडेचौदा वर्षाची अल्पवयीन मुलगी व साडेवीस वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा विवाह होणार असल्याचे प्रशासनाला कळाले. यावेळी प्रशासनाने तत्काळ देवगाव येथे विवाहस्थळ गाठत हळदीच्या दिवशी अल्पवयीन मुलगा-मुलगी व दोघांचे कुटुंबीय यांचे समुपदेशन करून हा विवाह थांबवण्यात आला असल्याची माहिती त्र्यंबकेश्वरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे यांनी दिली.

निफाड तालुक्यातल्या तारुखेडले या गावातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होत असतांना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अल्पवयीन मुलीच्या शाळेत जाऊन जन्म तारखेची पडताळणी केली आणि मुलीसह आई -वडिलांचे समुपदेशन करत हाही विवाह बेकायदेशीर असल्याचे लक्षात आणून देत, विवाह झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगत हा विवाह थांबवण्यात आला, अशी माहिती निफाड तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे यांनी बैठकीत दिली.

त्याचबरोबर युनिसेफच्या सीमा कानोळे यांनीदेखील बालकांशी निगडित योजना या कशा प्रकारे राबवाव्यात, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकने यासंदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजीव म्हसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, युनिसेफ (UNICEF) कडून सीमा कानोळे आदीसंह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -