अरुण बेतकेकर
केतकी चितळे एक वादग्रस्त अभिनेत्री, आक्षेपार्ह विधान करण्याची हौस, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, नवबौद्धासंदर्भात आक्षेपार्ह उल्लेख, मराठा समजावर टीका-टिप्पणी अशा एक न अनेक कारणास्तव वादग्रस्त. तिच्यावर पोलिसांत तक्रारी झाल्या, पण अटक झाली नव्हती. अलीकडे तिने शरद पवारांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. अन् गजहब माजला, जेवढा महाराजांविषयी विधान केल्यानंतरही माजला नव्हता. यावर मा. मु. उद्धव ठाकरे यांनी उडी घेत आपल्या १४ मेच्या जाहीर सभेत याचा उल्लेख केला, म्हणाले, “एक बाई, शरद पवारांवर कमेंट करते. मनोरुग्ण आहेत हे लोक, फार विचित्र कमेंट. घरी काही आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण आहेत की नाही? काही संस्कार होतात की नाही. तुझा संबंध काय. कोणाविषयी बोलतेस, काय बोलतेस. हे तुझे वक्तव्य असेल, तर तुझ्या मुला-बाळांचे काय होणार, ती काय होतील पुढे? हा जो सुसंस्कृतपणा आहे तो आपल्या देशातून-राज्यातून जात आहे. सुसंस्कृतपणा जपणे हेच हिंदुत्व.”
याच सभेत भाजपवर हिणकस टीका करताना मा. मु. म्हणाले, “भाजपचे हिंदुत्ववादी खालच्या पातळीची, विखारी भाषा करतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल गलिच्छ विचार त्यांनी व्यक्त केले. हेच का भाजपचे, संघाचे, भाजपप्रणीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार? संस्कार, संस्कृती आणि सुसंस्कृतपणा संपला, तर हिंदुत्व कसले.” अलीकडेच उद्धवजींना, पवारांविषयी पावलेले अंतर्ज्ञानही जाणकारांना आश्चर्यचकित करणारे आहे. इतक्या प्रमाणावर एखाद्याचे मतपरिवर्तन होऊ शकते हे अविश्वसनीय आहे. बाळासाहेबांनी, पवारांशी संबंध जोपासले. पण त्यांना अंतःपर्यंत राजकीय शत्रूच राखले. पवार हे विश्वासपात्र नाहीत हेच त्यांचे मत शेवटपर्यंत राहिले. उद्धवजींनीसुद्धा आपल्या राजकीय कारकिर्दीत वेळोवेळी शरद पवारांचा उल्लेख कशा प्रकारे केला आहे ते पाहा.
एका सभेत पवारांविषयी उद्धवजी म्हणाले, ते शब्दश: “शरद पवार यांची राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली?” हा प्रश्न जनसमुदायास करत ते म्हणाले, “वसंतदादांच्या म्हणजेच स्वतःच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून यांनी पुलोद काढली. का तर स्वतः मुख्यमंत्री व्हायचे, बाकी गेले खड्ड्यात, पक्ष गेले खड्ड्यात, माझे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे म्हणून. यानंतर राजीव गांधी यांच्याशी द्रोह केला. हे कालचे पोर, म्हणे याला काय समजते. पण पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर सोनियाजी आल्या. काय भूमिका घेतली, त्या विदेशी आहेत. सोनिया गांधींनी घातली लाथ, म्हणाले चल गेट आऊट. त्यावेळी पवारांना विचारलं तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? तर पवार म्हणाले, “छे छे अजिबात नाही. तशीच जर वेळ आली तर तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईन. मला वाटते त्या डांबराला सुद्धा लाज वाटली असती, मी काळा आहे रे पण मनाने काळा नाही आहे रे. मी रस्त्यावर निदान लोकांच्या उपयोगी तरी पडतो, तुम्ही कशाच्या उपयोगी पडता?”
उद्धवजींची काही वक्तव्ये जी सामना वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली.
९ एप्रिल २००९ : रामटेक, “शेतकरी गळफास घेत असताना सरकार थंड आहे. या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारलाच गळफास लावून फासावर लटकवा. यांना मत म्हणजे काळोखाला मत.”
१५ एप्रिल २००९ : इचलकरंजी, “पवारांनी शेतकऱ्यांना गुऱ्हाळात टाकून त्यांचा चिपाड केलं आहे. आता हे लोक पैसा, दारूच्या बाटल्या घेऊन येतील, साडी चोळीचे वाटप करतील, पण त्या पापाला हात लावू नका. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दुतोंडी राक्षसाचा वध करा.”
१४ एप्रिल २००९ : अमरावतीत पत्रकारांशी बोलताना, “पंतप्रधानपदी मराठी माणूस बसावा मात्र मराठी पंतप्रधान म्हणजे शरद पवार नाही. तूर्त तरी होण्याच्या लायक कुणी मराठी आहे, असे मला वाटत नाही.”
१७ एप्रिल २००९ : बारामती, “पाणी नाही, वीज नाही, डोक्यावर कर्जाचा बोजा. यामुळे माझा शेतकरी मरतोय. बारामतीत शेतकरी आत्महत्या करतोय आणि हे निघालेत पंतप्रधान बनायला. लाज वाटली पाहिजे काका-पुतण्याला.”
३१ मार्च २०१४ : सामना मुलाखत, “साध्वी प्रज्ञासिंग व कर्नल पुरोहितना ठरवून सडवल जातंय. तेसुद्धा कुणाच्या तरी धार्मिक दाढ्या कुरवाळण्यासाठीच. शरद पवारांना ‘एनडीए’त घुसू देणार नाही.”
०९ एप्रिल २०१४ : धाराशिव, “देवळात देव सुरक्षित नाही. दिवसाढवळ्या देवळे लुटली जात आहेत. महिलांची अब्रू धोक्यात आहे. जागे व्हा
आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची ही मोगलाई चिरडून टाका.”
१५ एप्रिल २०१४ : “पवारांच्या हातात वाढप्याचे भांडे दिले असते, तर त्यांनी भांड्यासकट खाल्ले असते.”
२१ एप्रिल २०१४ : ठाणे, “काँग्रेस-राष्ट्रवादिच्या नादान नेत्यांनी सारा देश नागडा केलाय… त्यांना कायमचे गाडून टाका.”
२१ एप्रिल २०१४ : ठाणे, “काँग्रेस-राष्ट्रवादिच्या नादान नेत्यांनी सारा देश नागडा केलाय… त्यांना कायमचे गाडून टाका.”
१६ एप्रिल २०१९ : परभणी, राष्ट्रवादी म्हणजे शेण खाणाऱ्यांची अवलाद. “पवार येथे आले, तर त्यांना सांगा शेण खाणारी अवलाद आमच्याकडे नको.”
१८ एप्रिल २०१९ : माणगाव, “गेली साठ-पासष्ठ वर्षे यांनी देशावर दरोडा घातला. घोटाळ्यांवर घोटाळे करत राज्यातही बेफाम लुटमार केली. अशा दरोडेखोर काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडासाफ करा.
आज उद्धवजींच्या मते पवारांविरुद्ध बोलणे म्हणजे अनैतिकता, असभ्यता, असंस्कृतपणा. आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द युतीत गुंफली गेली, जी युती बाळासाहेबांच्या दिव्यदृष्टीतून साकार झाली होती, त्यास तिलांजली देऊन आपण शरद पवारांना बिलगलात. लागलीच युतीत सडलो, असे अद्भुत-अद्वितीय ज्ञान आपणास प्राप्त झाले.
भाजप वा केतकी चितळे यांच्यावर आपण घसरलात ते शरद पवारांच्या वरील टीकेतून. केतकी ही तर नादान बालिका, ती बरळली ते कशासाठी? थोरले, स्वयंघोषित जाणते राजे फुत्कारले, “साल्यांनो, मी तुमच्या देवाचा बाप आहे.” यावरूनच ना? हा सुसंस्कृतपणा होतो का? हे कोणासाठी, ब्राह्मण का माझ्यासारख्या हिंदू आस्तिकासाठी? पवारांचे असे हिंदूंच्या बाबतच का होत राहते? जाळीदार टोपी घालून इफ्तार झोडताना का होत नाही? उद्धवजी, जनाची नाही किमान मनाची तरी राखा. या पवारांसाठी लाळघोटेपणास तरी पूर्णविराम द्या.