Tuesday, July 23, 2024
Homeकोकणरायगडमाथेरानच्या राणीच्या फेऱ्यांमध्ये वाढ

माथेरानच्या राणीच्या फेऱ्यांमध्ये वाढ

रायगड (प्रतिनिधी) : सध्या शाळांना सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे. यामुळे पर्यटन स्थळांवर गर्दी आहे. मुंबईपासून जवळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना करावी लागणारी कसरत आणि लूट आता थांबणार आहे. माथेरानच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद जास्तीत जास्त पर्यटकांना घेता येणार आहे. खासकरून लहान मुलांमध्ये माथेरानच्या राणीची क्रेझ आहे. माथेरानच्या राणीच्या फेऱ्यांमध्ये शुक्रवारपासूनपासून अप १० आणि डाऊन १० अशा एकूण २० फेऱ्या होणार आहेत. यापूर्वी एकूण अप आणि डाऊन मिळून १६ फेऱ्या चालविल्या जात होत्या.

माथेरान ते अमन लॉज अशा या एकूण २० फेऱ्या होणार आहेत. सोमवार ते शनिवार दरम्यान या २० फेऱ्या होतील. २० मे ते ३१ मे पर्यंत म्हणजे फक्त उन्हाळी सुट्ट्यांसाठी ही सेवा राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पर्यटकांच्या दळणवळणासाठी नेरळ-माथेरान मार्गावर परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय माथेरान नगरपरिषदेने घेतला आहे. नगरपरिषदेच्या परिवहन सेवेसाठी एसटी महामंडळाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्याने एक पाऊल पुढे पडले आहे.

एसटीच्या केवळ दोन फेऱ्या धावत असल्याने रोजगारासाठी तसेच शाळा-महाविद्यालयासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांना शाळेसाठी रोजचा टॅक्सीखर्च परवडत नसल्याने कुटुंबे माथेरान सोडून कर्जत तसेच नेरळ येथे स्थायिक होत आहेत. यामुळे माथेरानची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. स्थानिकांना परवडणाऱ्या दरात आणि आरामदायी सेवा मिळावी यासाठी माथेरान परिवहन सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळणार

कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी उद्योजकांबरोबर करार करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दिली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनींचा खासगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या अंतर्गत महाबळेश्वर, माथेरान, मीठबाव, हरिहरेश्वर आणि ताडोबा येथे निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी विकासकांना सवलतीचे करारपत्र देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -