पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील फळ उत्पादक शेतकऱ्यांचे दर्जेदार आंबे सातासमुद्रापार म्हणजे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पाठविण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी झाल्यामुळे भारतातून अमेरिकेत होणारी आंब्याची निर्यात यावर्षी पुन्हा सुरू झाली आहे. या आठवड्यात वॉशिंग्टन येथील आंबा विक्री प्रदर्शनात विविध प्रकारचे आंबे असलेली पेटी थेट राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना पाठविण्यात आली.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंबा निर्यात ठप्प होती. मात्र, आता आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाल्याने अमेरिकेत केशरपेक्षा हापूसला चांगली मागणी आहे. ‘रेनबो इंटरनॅशनल’ ही पुण्याची आंबा निर्यातदार कंपनी अमेरिकेत पाच प्रकारचे आंबे निर्यात करते. त्यामध्ये महाराष्ट्रातील केसर, हापूस, गोवा मानकूर, आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बांगनपाली यांचा समावेश असून हे आंबे अमेरिकेला पाठविण्यात आले आहेत.
रेनबो इंटरनॅशनल ही बारामती येथील कंपनी असल्याने बारामतीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत याबाबत आनंद व्यक्त केला. बारामतीतील जळोची येथे रेनबो इंटरनॅशनलने पाठवलेला आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. अमेरिकन राष्ट्रपतींना पाठवलेल्या आंब्यांमध्ये हापूस, केशर आणि गोव्यातील मानकूर आंब्याचा समावेश आहे.