
मुंबई (प्रतिनिधी) : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरात पालिकेला अनधिकृत बांधकाम आढळले असून १५ दिवसांत बांधकाम पाडा अन्यथा आम्ही पाडू अशी नोटीस पालिकेने राणा दाम्पत्याना दिली आहे.
खार पश्चिम येथील लाव्ही इमारतीत राणा दाम्पत्याचे घर आहे. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीसही पाठवली होती. मात्र राणा हे तुरुंगात असल्याने दोन्ही वेळा पालिकेचे पथक पाहणीविनाच निघून गेले होते. त्यानंतर तिसऱ्यांदा मात्र पालिकेच्या पथकाने राणा दाम्पत्याच्या घराची पाहणी केली होती.
मुंबई महापालिकेला पाहणी दरम्यान राणा दाम्पत्याच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचे आढळले. त्यामुळे राणा दाम्पत्याला पालिकेने नोटीस बजावली होती. मात्र बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचे राणा यांनी उत्तर दिले होते. दरम्यान पुन्हा पालिकेने नवीन नोटीस बजावली आहे. त्यानुसार बांधकाम पाडण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.