Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरबांधकाम व्यावसायिकांकडून कांदळवनाचा ऱ्हास

बांधकाम व्यावसायिकांकडून कांदळवनाचा ऱ्हास

चिंचणी-तारापूर सागरी महामार्गालगतच्या खाडी क्षेत्रात अवैध भराव

पालघर (वार्ताहर) : चिंचणी- तारापूर सागरी महामार्गालगत दिवसेंदिवस अवैध बांधकामे वाढू लागली आहेत. या बांधकामांसाठी संबंधित मंडळीकडून बांधकाम ठिकाणी असलेल्या तिवरांच्या झाडांची कत्तल सुरू आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने खाड़ी क्षेत्रात अवैध बांधकाम करणारे मोकाट असल्याचे उघड झाले आहे.

चिंचणी- तारापूर मुख्य सागरी महामार्गालगत खाडी क्षेत्रात भराव टाकून बांधकाम करण्याचे काम दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या खाडी क्षेत्रात कांदळवने असतानाही या अनधिकृत बांधकामांवर महसूल आणि वनविभाग कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. चिंचणी-तारापूर सागरी महामार्गालगत कांदळ वनक्षेत्राशेजारील जागेत भरावासाठी गौण खनिजाचा (मुरूम) उपयोग केला जात आहे. या भरावसाठी लागलेल्या गौण खनिजाचा महसूल भरला आहे की नाही हा संशोधनाचा विषय असला तरीही या आधीही या जागेत मातीचा भराव करण्यात आला होता. तेव्हा गावकऱ्यांनी वेळीच दखल घेऊन वनविभाग आणि महसूल विभाग यांना ही बाब निदर्शनास आणून भराव थांबून वानगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी राखेचा भरावही करण्यात आला होता. आता पुन्हा वर्षभराच्या कालावधीनंतर त्याच जागेत गौण खनिजाचा भराव करून कांदळवनाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मागील काही वर्षांपासून खाडी भागात अनधिकृतरीत्या कांदळवनांची कत्तल करून या जागेवर भराव टाकत जोमाने बांधकामे करण्यात येत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडे विचारणा केली की, या घटनेची चौकशी करून कारवाई करू, असे उत्तर देण्यात येते. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई वास्तवात केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

संबंधित खाजण जागेवरती टाकलेल्या भरावाचा पंचनामा करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठवण्यात येणार आहे.– ज्योस्पिन गमजा, चिंचणी मंडळ अधिकारी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -