Wednesday, July 9, 2025

पोईसर नदी पात्रातील १६ बांधकामे पालिकेने हटविली

पोईसर नदी पात्रातील १६ बांधकामे पालिकेने हटविली

मुंबई (प्रतिनिधी) :कांदिवली (पश्चिम) परिसरातील पोईसर नदीच्या पात्रात अडथळा ठरणारी १६ बांधकामे पालिकेने हटविली. तर उर्वरित १३ बांधकामे देखील पाठोपाठ हटविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पोईसर नदी ही मुंबई पालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागातील अर्थात कांदिवली (पश्चिम) परिसरातील मंगूभाई दत्ताजी पुलाच्या जवळ असणाऱ्या लालजी पाडा परिसरातून देखील वाहते. पावसाळ्यात अतिवृष्टी दरम्यान नदीलगतच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता असते.


या अनुषंगाने प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमध्ये नदीच्या किनारी संरक्षक भिंत बांधण्याचाही समावेश आहे. मात्र, ही भिंत बांधण्यात या परिसरातील काही बांधकामांचा / झोपड्यांचा अडथळा येत होता. या अनुषंगाने अतारिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार 'परिमंडळ – ७' च्या उप आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या स्तरावर सातत्याने समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात येऊन संबंधितांशी संवाद साधण्यात आला.


यानंतर शुक्रवारी सकाळपासून करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कारवाईदरम्यान १६ बांधकामे / झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान स्थानिकांचे चांगले सहकार्य महानगरपालिका प्रशासनाला लाभले, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली.


‘आर दक्षिण’ परिसरातून वाहणाऱ्या पोईसर नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. यासाठी या परिसरातील सुमारे १३० बांधकामे / झोपड्या प्रभावीत होणार आहेत. तथापि, येत्या पावसाळ्यापूर्वी ज्या भागात भिंत बांधणे प्राधान्यक्रमानुसार आत्यंतिक गरजेचे आहे, अशा भागातील २९ बांधकामे पहिल्या टप्प्यात हटविण्यात येणार आहेत.


या २९ बांधकामांपैकी १६ बांधकामे शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान हटविण्यात आली आहेत. तर उर्वरित १३ बांधकामे देखील पाठोपाठ हटविण्यात येणार आहेत. ही बांधकामे हटविल्यानंतर लगोलग संरक्षक भिंतीचे बांधकाम देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सुरू करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >