Sunday, July 21, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात प्रभाग रचना पुन्हा न्यायालयाच्या दारात?

ठाण्यात प्रभाग रचना पुन्हा न्यायालयाच्या दारात?

राजकीय पक्षात धुसफूस सर्वाधिक नाराजी शिवसेनेत

अतुल जाधव

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी १४ मे रोजी बहुचर्चित अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली; परंतु पुन्हा एकदा अंतिम प्रभाग रचनेवरून ठाण्यात राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे या प्रभाग रचनेच्या आराखड्यावर शिवसेनेमध्येच सर्वाधिक नाराजी असल्याने या नाराजीचे पडसाद कसे उमटतात, यावर ठाण्यातील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.

त्याचप्रमाणे इतर राजकीय पक्षात देखील मोठ्या प्रमाणात प्रभाग रचनेबाबत कुरबुरी वाढत आहेत. सर्वच राजकीय पक्षांत खदखद वाढत असल्याने काही प्रभाग रचनेबाबत न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली तेव्हाच ठाण्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. सर्वच राजकीय पक्षांनी प्रारूप आराखड्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात या प्रारूप आराखड्यावर सूचना आणि हरकती प्राप्त झाल्या. त्यावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी देखील हरकती आणि सूचना यांचा भडीमार झाल्याचे दिसून आले. आवश्यक त्या नोंदींची दखल घेऊन निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविण्यात आला. पालिका प्रशासनाने पाठवलेल्या अहवालानंतर निवडणूक विभागाने अहवालाची दखल घेऊन अंतिम प्रभाग रचना ठाणे महापालिकेकडे प्रसिद्ध करण्यासाठी पाठवली. त्यानंतर महापालिकेने अंतिम प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रभाग आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांना पुढील संकटाची कल्पना आली. अनेक विद्यमान नगरसेवकांना आपल्या प्रभागाची झालेली तोडफोड पाहून माजी नगरसेवक होण्याचा धोका लक्षात आला त्यातून सर्वच राजकीय पक्षात कुरबुरी आणि अंतर्गत धुसफूस वाढली आहे.

शिवसेनेत सर्वाधिक धुसफूस

अंतिम प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वाधिक नाराजी शिवसेना पक्षात दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर फाडण्याच्या वादावरून सेनेच्या दोन नगरसेविका आपापसात भिडल्या होत्या. त्याच्या मुळाशी प्रभागावर वर्चस्व हा मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे.

आयुक्तांच्या भूमिकेमुळे चर्चेला उधाण…

ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असली तरी अंतिम प्रभाग रचना महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सहीविनाच प्रसिद्ध करण्यात आली असल्याची चर्चा ठाण्यात आहे. पालिका आयुक्तांनी या प्रभाग रचनेवर सही का केली नाही. आयुक्तांवर कोणाचा दबाव होता याची देखील चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीबाबत उत्सुकता

अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर महापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली आहे. दुसरीकडे ठाण्यात महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात महाविकास आघाडी होणार की नाही, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -