जयपूर : “स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य ठरवत आहेत. भाजपाचीही पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य ठरवण्याची हीच ती वेळ आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ हाच आपला मंत्र आहे. देशातल्या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहे. देशासमोर जी आव्हाने आहेत, ती देशातल्या जनतेसोबत राहून आपल्याला परतवून लावायची आहेत,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना केले.
जयपूरमध्ये गुरुवारपासून भाजपाची तीन दिवसीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावली.
जगाच्या भारताकडून खूप अपेक्षा आहेत. तसेच देशातही भाजपाबद्दल लोकांच्या मनात विशेष प्रेमाची भावना आहे. देशातली जनता भाजपाकडे विश्वासाने, अपेक्षेने पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
या बैठकीत यावर्षी गुजरात, हिमाचलमध्ये होणाऱ्या तसेच पुढच्या वर्षी अनेक राज्यात होणाऱ्या निवडणुका आणि २०२४ मधल्या लोकसभा निवडणुकांबद्दलची चर्चा होणार आहे. देशाच्या जनतेच्या आशा-आकांक्षांमुळे आपले दायित्व अधिक वाढले असल्याची भावनाही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.