कासा (वार्ताहर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बुधवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान गॅसचा टँकर पलटी झाल्याने गॅसची गळती झाली. मेंढवण खिंडीतील तीव्र उतारावर हा भीषण अपघात झाला. यामुळे मुंबई-अहमदाबाद मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवली होती.
मुंबई वाहिनीवरून गुजरातकडे भरधाव गॅस टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पुढे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेंपोवर आदळून तो विरुद्ध दिशेला मुंबई-अहमदाबाद मार्गावर जाऊन पलटी झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस यंत्रणा दाखल झाली.
जखमीना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. टँकर पलटी होऊन महामार्गांवर मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागल्याने महामार्ग व पोलीस प्रशासन यांनी प्रसंगावधान राखत वाहतूक रोखली. काही तास महामार्ग बंद होता. दीड तासानंतर डहाणू अदानी कंपनीच्या अग्निशमन दलाने पाणी मारले. त्यानंतर वाहतूक सावकाश सुरू केली.
मेंढवण येथील याच वळणावर अनेक अपघात घडले आहेत. १९९२ साली टँकरच्या अपघातात ११३ जणांचा बळी गेला होता. महामार्गांवर अनेक अपघाती स्थळ असून अपघाताचे सत्र सुरूच आहे. यासाठी महामार्ग प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तीव्र वळणे, उड्डाणपूल, अवैध क्रॉसिंग, अपूर्ण सेवा रस्ते सुधारावे यासाठी नागरिक, वाहनचालक मागणी करीत आहेत.