प्रा. प्रवीण पांडे, अकोला
सनातन धर्मातील संतांनी जे विचार धन आपणा सर्वांना उपलब्ध करून दिले आहे. त्याचा प्रत्येक कण हा वेचून घेतला पाहिजे, नव्हे तसा तो वेचून घेता आला पाहिजे. पण हे सहज शक्य नाही. कारण त्याची उपलब्धी आणि विपुलता इतकी आहे, की त्याकरिता एक मानव जन्म पुरणे कदापि शक्य नाही. पण एक मात्र अगदी खरे की त्यातील शक्य ते वेचून घेण्याचा प्रयत्न निश्चितच केला पाहिजे.
जसजसे आपण संत साहित्याचे वाचन करू, तसतसे हळूहळू त्याचे आकलन होत जाईल. अनेक संतांनी साहित्य अतिशय सोप्या शब्दांत मांडले आहे. समजावून दिले आहे. अतिशय समृद्ध शब्दभांडार आणि विचारधन यांचा अमूल्य असा खजिनाच जणू.
संत साहित्य वाचताना हे लक्षात येते की एवढे विदत्ताप्रचुर लिखाण केल्यावरही त्याबद्दलच्या भूमिकेबाबत लिहिताना त्यामधून दिसून येणारा या संत मंडळींचा विनम्र भाव, विनयशीलता, आणि उपास्या ठायी असणारी लीनता ही आपल्याला (अती सामान्य माणसाला) सुद्धा अहंभाव कमी होण्यास सहाय्यभूत ठरते. आणि म्हणून संत साहित्य अवश्य वाचले पाहिजे.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी गीता या ग्रंथावर टीका लिहिली. तिचे नावातच महती कळून येते. ‘भाव’ + ‘अर्थ’ + ‘दीपिका’ = ‘भावार्थ दीपिका’. गीता सोपी करून प्राकृतात उपलब्ध करून दिली. केवढे मोठे कार्य. पण समारोपात माऊली मागतात काय? पसायदान. विश्व कल्याणाची प्रार्थना, एक मनोज्ञ मागणे.
‘‘दुरितांचे तीमिर जावो
विश्व स्वधर्म सूर्य पाहो
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात’’
समारोपात माऊली अतिशय विनयाने विश्वात्मक देवतेला विनंती करतात…
संत रामदास स्वामींनीदेखील मनाचे श्लोक आणि ग्रंथराज दासबोधामधून समाजाकरिता फार अमूल्य असा ठेवाच उपलब्ध करून दिला आहे. अगदी जीवनामध्ये व्यवस्थापन व वर्तन कसे असावे याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन यातून प्राप्त होते.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे देखील तसेच आहे. हे अभंग म्हणजे तर भक्ती रस, कारुण्य, रूपक यांची जणू खाणच आहे. एक एक अभंग हा शब्द आणि भाव यांचे उत्कृष्ट मिश्रण.जसे, पुढील काही अभंगांची मार्मिक रचना बघा…
‘‘अगा करुणाकरा
या मज सोडवा लवकरी करुणाकरा’’
भवबंधनातून सोडविण्याकरिता केलेली भगवंताची आळवणी.
हा अभंग ऐकत असताना मगरीने तोंडात पाय धरून ठेवलेला गजेंद्र आणि त्याची सोडवणूक करण्याकरिता धावून आलेले सुदर्शन चक्रधारी भगवान विष्णू मन:चक्षूपूढे दिसू लागतात.
निसर्गाशी साधर्म्य, जवळीक दाखविणारा सुंदर अभंग – ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ आणि असे कितीतरी अभंग संत तुकाराममहाराज आणि इतरही अनेक संत मंडळींनी रचून त्याद्वारे तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि भक्ती याची उत्तम सांगड घातली आहे.
संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत निळोबा राया, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत नामदेव, प्रज्ञा चक्षु संत श्री गुलाबराव महाराज, संतकवी दासगणू महाराज अशी किती तरी संतश्रेष्ठ मंडळीं आहेत. ज्यांचे साहित्य हे अनादी काळापासून ते पुढील अनंत काळापर्यंत समाज प्रबोधन आणि मार्गदर्शन करीत होते, करीत आहे आणि निश्चितच करीत राहणार आहे.
अशा कितीतरी संतांचे योगदान या भारताच्या भूमीवरील जनांना प्राप्त झाले आहे, हे आम्हा सर्वांचे अहोभाग्यच. यातील नावे कितीही सांगितली तरीदेखील ही यादी संपूर्ण होऊच शकत नाह, इतकी या संतांची आणि राष्ट्राची संपन्नता आणि महती आहे. अशा भक्तिमय वातावरण निर्मितीमधूनच संतांनी समाजाला शिकवण दिली आणि यामधूनच राष्ट्र कार्य आणि धर्म कार्य उभे केले आहे. आणि म्हणूनच म्हटले जाते…
‘‘राष्ट्राच्या कल्याणा संतांच्या विभूती’’