
मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा कर्मचारी व सफाई कर्मचाऱ्यांच्या कष्टाची कमाई मुंबई महापालिका प्रशासनातील काही अधिकारी व कंत्राटदार लुटण्याचे काम करत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी केला आहे. गोरगरीब मुंबईकरांच्या कष्टाचे २०० कोटी महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेने टक्केवारीसाठी कंत्राटदारांच्या घश्यात घातले. महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहू नका, असे ट्विट करत योगेश सागर यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
https://twitter.com/Yogeshsagar09/status/1527556222018150400महानगरपालिका प्रशासनाकडून कामगारांच्या आयुष्याशी व त्यांच्या भविष्याशी खेळ सुरु असून खासगी कंत्राटदारांना हाताशी धरुन पालिका प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांचा थेट भविष्य निवाह निधी हडप करत असल्याचेही योगेश सागर यांचे म्हणणे आहे. योगेश सागर यांनी यासंदर्भात केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे तक्रार करत पत्र दिले आहे.
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीत तब्बल १९० कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे. तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा जवळपास साडेसहा कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विशेष म्हणजे यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त गंभीर नाहीत. तसेच राज्य सरकार याबाबत गांभीर्याने विचार करीत नाही. यामुळे या घोटाळ्याकडे लक्ष वेधत आपण याची दखल घेत चौकशी करावी, अशी मागणी आमदार सागर यांनी पत्राद्वारे केली आहे.