इस्तंबुल (वृत्तसंस्था) : भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीनने महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पाचवी भारतीय महिला ठरली आहे. इस्तंबुलमध्ये झालेल्या सामन्यात तिने थायलंडची जुतामास जितपाँगला ५-० असे पराभूत केले.
निखत झरीनने ५२ किलो वजनी गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा अंतिम सामना जिंकत सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचवली. आतापर्यंत एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉक्सिंगपटूंनी जागतिक विजेतेपद पटकावली आहेत. यात आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.
उपांत्य सामन्यात निखतने आत्मविश्वासाने खेळ करीत ब्राझिलच्या कॅरोलिन डी अल्मेडाला ५-० असे सहज नामोहरम केले होते. कनिष्ठ विश्वविजेत्या निखतने संयमी खेळाचे प्रदर्शन करीत कॅरोलिनवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते.