मुंबई : महिलेला माझा धक्का लागला असेल तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला दिले आहे. अटकपूर्व जामीन झाल्यावर संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी, ‘आम्ही सरकारविरोधी बोलू नये, आमचे थोबाडं बंद राहावेत यासाठी आमच्यावर खोटे आरोप दाखल केल्याचा आरोप केला’.
संदीप देशपांडे यांच्यावर महिला पोलिसांना धक्का दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेच्या नंतर निर्माण झाल्याच्या तणावाच्या वातावरणात मनसे नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेताना त्यांनी महिला पोलिसांना धक्का मारल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर त्यांना आता कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी माध्यमांचे आभार मानले आहेत. “तुम्ही दाखवलेल्या फूटेजवरून आम्ही कसलाही गुन्हा केला नाही हे स्पष्ट झाले, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो.” असे ते म्हणाले. “मी जर धक्का मारल्याचे तुम्ही दाखवले तर मी राजकारण सोडून देईन.” असे आव्हान त्यांनी दिले आहे.
शिवसेना आणि हे सरकार सूडाचे राजकारण करत आहे हे सांगताना त्यांनी गांधीजींचे एक उदाहरण दिले. “मी घरी नसताना माझी मुले आणि बायको घरी असताना तुम्ही पोलिस पाठवता हे तुम्हाला पटते का? आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचे येतील.” असे संदीप देशपांडे म्हणाले.