Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

लालू यादव यांच्या घरी सीबीआयची धाड

लालू यादव यांच्या घरी सीबीआयची धाड

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष (आरजेडी) लालू यादव यांच्या पाटणा येथील निवास्थानी शुक्रवारी सकाळी सीबीआयने धाड टाकली आहे. माजी मुख्यमंत्री आणि लालू यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानी सीबीआयचे पथक धडकले. त्याशिवाय बिहारमधील गोपालगंज, मध्यप्रदेशातील भोपाळ आणि दिल्ली येथील लालू यादव यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर सीबीआयने एकाचवेळी १५ ठिकाणी कारवाई केल्याची माहिती पुढे आली आहे.

यासंदर्भात पुढे आलेल्या अधिकृत माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण लालू यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरतीत झालेल्या हेराफेरीशी संबंधित आहे. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात लालू यादव यांनी लोकांकडून त्यांच्या जमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. लालू यादव-राबडी देवी यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव पाटण्यात नसताना हा छापा पडला आहे. दोन दिवसांपूर्वी तेजस्वी लंडनला रवाना झाले आहेत. तर लालू यादव सध्या त्यांची मोठी मुलगी आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आहेत. पटना व्यतिरिक्त बिहारच्या गोपालगंज, दिल्ली आणि भोपाळमध्येही ही छापेमारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

राबडी देवी यांच्या पाटणा येथील १०, सर्कुलर रोड येथील निवासस्थानावर शुक्रवारी सकाळी ६ वाजता सीबीआयचे अधिकारी पोहोचले. सीबीआय अधिकाऱ्यांनी राबडी देवी यांच्या निवासस्थानी प्रवेश करताच दरवाजे बंद केले. यानंतर कुणालाही घरात प्रवेशास मज्जाव करण्यात आला. तसेच घरातील लोकांनाही बाहेर जाऊ दिले जात नव्हते. सीबीआय अधिकाऱ्यांना घेऊन जाणारी किमान तीन वाहने राबडी देवी यांच्या निवासस्थानाबाहेर उभी करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा