भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी काही वाहनचालक वेळ वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याच्या अनेक घटना समोर येत असून यात अनेकदा अपघात होऊन काहीजण जखमी देखील झाले आहेत.
वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी सोनाली नाका, गोल्डन नेस्ट, सिल्व्हर पार्क अशा मुख्य ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचलकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात मीरा-भाईंदर शहरात मुख्य रस्त्यावर पहाटे ६.१५ च्या सुमारास गोल्डन नेस्टकडून काशिमिराच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक बसल्याने रिक्षाचा अपघात होऊन रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा पल्टी झाल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती.
अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत त्यामुळे वाहतूक कर्मचारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहेत.
वर्षभरात ५६४ वाहनचालकांचे समुपदेशन
काशिमिरा वाहतूक पोलीस मीरा-भाईंदर परिसरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. गेल्या वर्षभरापासून वाहतूक शाखेने हेल्मेट, सीट बेल्ट, उलट्या दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारचे कायदे तोडणाऱ्यांवर कायद्याच्या प्रति आदर वाटला पाहिजे, त्यांचबरोबर पुन्हा वाहन चालवताना कायद्या तोडू नये याकरिता वाहनचालकांचे ‘समुपदेशन’ करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात काशिमिरा वाहतूक पोलिसांनी ५६४ वाहनचालकांचे समुपदेशन केले आहे.