मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिका शाळांमध्ये सेवेत असलेल्या १३० शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पूर्ण केली नाही म्हणून बडतर्फ करण्यात आले आहे. या शिक्षकांना मार्च २०१९ ही अखेरची मुदत देण्यात आली होती. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने उन्हाळी सुटी सुरू झाल्यानंतर १ मे रोजी या शिक्षकांना बडतर्फीचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे हे शिक्षक दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार २०१३ नंतर झालेल्या शिक्षक नियुक्तीवेळी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ उत्तीर्ण नसणाऱ्यांना मार्च २०१९ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यांनी या कालावधीत ही परीक्षा उत्तीर्ण न केल्याने अखेर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्याचेही पालिका शिक्षण अधिकारी राजे कंकाळ यांनी सांगितले.
केंद्राने २०१०मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा लागू केली. राज्यात त्याची अंमलबजावणी २०१३ पासून करण्यात आली. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मार्च २०१९ची अंतिम मूदत देण्यात आली होती. मात्र ज्या राज्यांमध्ये २०१०पासून शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात आली, तेथे त्यांना नऊ वर्षांचा कालावधी मिळाला.