Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखवाहतूक कोंडी : सरकार निद्रिस्त, मुंबईकर त्रस्त

वाहतूक कोंडी : सरकार निद्रिस्त, मुंबईकर त्रस्त

”हे असे असले तरी, हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही.” ही उर्दू साहित्यातील गझल मराठीत रुजविणारे कवी सुरेश भट यांची कविता. आज या कवितेतील ओळी आठवल्या, त्या मुंबईतील वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या सर्वसामान्य व्यक्तीकडे पाहून. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार आहे, ही मुंबईकरांची जणू जीवनपद्धत झाली आहे. मुंबईवर १९९३पासून साखळी बॉम्बस्फोटाच्या अनेक घटना घडल्यानंतर मुंबई थांबली नव्हती. मात्र कोरोना काळात नाईलाजास्तव म्हणून मुंबईकर घराबाहेर पडला नाही. कोरोनाचे निर्बंध सरकारने हटविल्यानंतर आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे स्वत:चे खासगी असो किंवा सार्वजनिक वाहनांनी कामाच्या ठिकाणी पोहोचणे याला प्रत्येकजण प्राधान्य देताना दिसतो; परंतु गेल्या आठवड्यापासून मुंबईत रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. आधीच नोकरीधंद्यावर आलेल्या आफतीनंतर कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी होत असलेल्या विलंबामुळे मुंबईकर अजून हैराण आहे. मुंबईमध्ये दळणवळणाची मोठी साधने आहेत. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून ६५ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. सोबत मोनो, मेट्रो रेल्वेने लोक प्रवास करतात; परंतु रेल्वे स्थानकापासून शहराच्या विविध भागांतील इच्छित स्थळी जाण्यासाठी काळी-पिवळी टॅक्सी, रिक्षासह ओला-उबेरसारख्या टॅक्सीचा मुंबईकर आधार घेतात. त्याचबरोबर मुंबईतील बेस्ट बस ही तत्पर आहे. सार्वजनिक अथवा खासगी वाहनांनी प्रवास करता येत नाही, ही समस्या नाही, तर ज्या वाहनामध्ये आपण बसून प्रवास करत आहोत ते वेळेवर पोहोचेल की नाही याची सध्या कोणाला खात्री देत येत नाही. मुलुंडमधून वांद्रा येथे बेस्टच्या बसने येण्यासाठी नेहमी एक ते सव्वातास लागतो. सध्या तो प्रवास अडीच तासांच्या अधिक तासांचा झाला आहे.

दादरहून मंत्रालयाकडे जाण्यासाठी तासभर लागत होता. आता दोन तासांपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. याचा अर्थ मुंबईतील कोणतेही प्रमुख रस्ते पाहा. त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात आणि त्यामुळे या वाहतुकीच्या कोंडीत अडकून सर्वसामान्य माणसाची काय अवस्था होत आहे, हे आता पोलीस ताफ्याच्या गाडीतून फिरणाऱ्या मंत्र्यांना कसे कळणार? या कोंडीमुळे मुंबईतील रस्त्यांना श्वास घेण्यासाठी वेळ नाही असे म्हणण्याची वेळ आली असून त्याची जाणीव पालकमंत्री म्हणून मिरवणाऱ्या दोन मंत्र्यांना आहे का, याचा विचार मुंबईकर करत आहेत. अनेक ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यात महापालिका, बेस्ट प्रशासन याच्याकडून खड्डे खोदण्याची कामे जागोजागी दिसतात. यंदा मे अखेरीस मान्सून येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रस्त्याच्या कडेला पाहाल, तर वाहने उभी केलेली दिसतात. त्यातून वाहनांनी गती मंदावते, असे बोलके चित्र आज मुंबईभर आहे. त्यामुळे दोन तासांच्या प्रवासाऐवजी मुंबईकरांचे पाच ते साडेपाच तास प्रवासात गेल्यावर कामे उरकण्यासाठी त्राण शिल्लक राहतो का? याचा आता विचार करण्याची गरज आहे. खरं तर हा विचार मुंबईचे पालकमंत्रीपद भूषवणाऱ्या अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी करायला हवा; परंतु वाहतूक कोंडी ही मुंबईकरांची मोठी डोकेदुखी आहे, याची त्यांना अजून कल्पना आलेली नसावी. तसे असते तर वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलीस, महापालिका, नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी तातडीने बैठका घेतल्या असत्या; परंतु तसे होताना दिसत नाही. मुंबईकरांना वाऱ्यावर टाकले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे.

आज मुंबई शहरात साधारणत: ३५ लाख वाहने आहेत. एकूण प्रमुख आणि छोटे रस्ते मिळून ११०० रस्त्यांची संख्या कागदावर आहे, तर फुटपाथ २२०० किमी इतके आहेत. वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने मुंबईकर ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी गाडी पार्किंग करताना दिसतात. त्यातून अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा येतो. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने यावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाहतूक पोलीस विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. यामध्ये मुंबई महापालिका, परिवहन विभाग, बेस्ट, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन या विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीवर पार्किंग आणि वाहतूक कोंडी समस्येवर उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मुंबईत रस्त्याच्या कडेला किंवा नो-पार्किंग झोनमध्ये गाडी पार्क केली की टोईंगची गाडी यायची आणि गाडी उचलून घेऊन जायची. आता मुंबई पोलीस संजय पांडे यांनी गाड्या टोईंग करण्यापेक्षा वाहतूक पोलिसांना मोबाइलवर गाड्यांचा नंबर येईल, असा फोटो काढण्याचे फर्मान काढल्यामुळे, वाहतूक चौकातील वाहतूक पोलीस सध्या वाहतुकीची कोंडी का झाली, यापेक्षा कोणत्या गाडीने सिग्नल तोडला याचा फोटो काढण्यात व्यस्त असल्याचे दिसतात. त्यामुळे वाहतुकीतील गाड्यांची गर्दी नियंत्रणात आणण्याकडे सध्या वाहतूक पोलिसांचे लक्ष कमी झालेले दिसते. त्याचा परिणाम सर्वसामान्य मुंबईकरांना भोगावा लागत आहे. जर वाहतूक पोलिसांना मनुष्यबळ कमी पडत असेल, तर होमगार्ड, सिव्हिल डिफेन्समधील प्रशिक्षित मंडळी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा स्वयंसेवक म्हणून उपयोग करता येऊ शकतो. त्यामुळे आता वाहतूक व्यवस्थेकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -