Thursday, October 30, 2025
Happy Diwali

अत्यल्प दर मिळाल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

अत्यल्प दर मिळाल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

समीर पठाण लासलगाव : विंचूर उपबाजार कांदा आवारात गुरुवारी झालेल्या कांदा लिलावात देशमाने बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या गोलटी स्वरूपातील कांद्याला ५१ रु. क्विंटल बाजारभाव मिळाल्यामुळे नाराज झालेल्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांदा न विकताच घरी जाणे पसंद केले. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ४०० ते ५०० बाजारभाव इतका कमी दर मिळत आहे. त्यामुळे कांद्यातून नफा तर सोडाच पण वाहतूक खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. त्यात देशमाने येथील शेतकऱ्याच्या गोलटी स्वरूपातील कांद्याला ५१ रु क्विंटल बाजारभाव मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी सुशील दुघड यांनी त्यांचा गोलटी स्वरूपातील कांदा विंचूर उपबाजार येथे लिलावासाठी आणला होता. लिलावात या कांद्याला २०० रुपयांची बोली लावण्यात आली. परंतु कांद्याची प्रतवारी तुलनेत थोडी कमी असल्याने लिलावात शिव भोले या कंपनीने या कांद्याला ५१ रु. प्रति क्विंटल बोली लावल्यामुळे नाराज झालेल्या या शेतकऱ्याने हा कांदा न विकताच घरी जाणे पसंद केले. तर बाजार समिती प्रशासनाने याबाबत सांगितले की लिलावास आलेला कांदा हा खूपच कमी गुणवत्ता असलेला असून खाण्या योग्य व प्रतवारी केलेला नसल्याने या कांद्याला जाहीर लिलावात कमी दर मिळाला आहे.

सद्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीस मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. उष्णतेमुळे कांद्याची प्रतही खराब होत आहे. साठवणूक झाल्यानंतर उर्वरित कांदा शेतकरी लिलावासाठी बाजार समितीत आणत आहेत. उष्णतेमुळे या कांद्याची प्रत घसरली असल्यामुळे कांद्याला अपेक्षित भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून लिलावासाठी आणल्यास योग्य असे बाजारभाव मिळतील, असे आवाहन लासलगाव बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment