कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील पिंगळस येथील सरकारी सर्व्हे न ४५/४ क्षेत्र ०.२३.० क्षेत्रापैकी व क्षेत्रासह खुला सार्वजनिक रस्ता अंदाजे १७ ते १८ फूट रुंद असलेला पूर्वापार ग्रामस्थ, शेतकरी यांचा वापर वहिवाटीत आहे तसेच पिंगळस स्मशानभूमीकडे जाणाऱ्या या सार्वजनिक रस्त्यात अतिक्रमण करून दिलीप विष्णू कदम यांनी वहिवाटीत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी याबाबत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी पिंगळस ग्रामपंचायतीला सदरील बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र ग्रामपंचायत अद्यापपर्यंत भूमिका का घेत नाही याबाबत तक्रारदार अनंता दिसले यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. पिंगळस ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कायमस्वरूपी खुला ठेवला आहे. पिंगळस ते आंबिवली धामणी मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या भागात दिलीप कदम यांनी रस्त्याच्या बाजूला कठडा उभारल्याने ये- जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. या कठड्याला गाड्यांचे पार्ट घासून नुकसान होत आहे.
कदम यांनी केलेले बांधकाम ग्रामपंचायतीने त्वरित हटवून रस्ता मोकळा करावा याकरिता अजय दिसले, मनोहर भोईर यांनी तहसील, पंचायत समिती कार्यालयात २०१६ पासून पत्रव्यवहार करत होते. याबाबत घटनास्थळी अधिकारी वर्गानी पाहणी करून बांधकाम तोडण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचे अनंता दिसले यांचे म्हणणे आहे.
जिवे मारण्याच्या धमक्या देऊन खुलेआम बांधकाम करीत आहे. ग्रामपंचायतींना आदेश दिले असूनही ग्रामपंचायत फक्त नामधारी नोटीस बजावत आहे मात्र कारवाई काहीच नाही. -अनंता दिसले (तक्रारदार, पिंगळस)
कदम यांना नोटीस काढण्यात आली होती. पण राजकीय दबाव येत असल्याने बांधकाम हटविण्यास विलंब होत आहे. परंतु लवकरच पोलीस बंदोबस्त घेऊन बांधकाम तोडण्यात येईल. -रमेश देशमुख (सरपंच, पिंगळस)
अनधिकृत कठड्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती तेव्हा कदम यांनी दमदाटी केली होती. पुन्हा आम्ही नोटीस बजावून आठ दिवसांची मुदत देण्यात येणार अन्यथा पोलीस बंदोबस्त घेऊन बांधकाम तोडण्यात येईल.
-राम म्हात्रे (ग्रामसेवक)