Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीनालेसफाईची कामे केवळ ३५ टक्केच!

नालेसफाईची कामे केवळ ३५ टक्केच!

आशिष शेलार यांची टीका; भाजपकडून पाहणी दौरा

मुंबई (प्रतिनिधी) : नालेसफाईच्या कामांबाबत भाजप आक्रमक असून गुरुवारी भाजपने दुसऱ्यांदा मुंबईतील नालेसफाईचा पाहणी दौरा केला. मुंबईतील नालेसफाईची कामे काटावर पास व्हावे एवढी ३५ टक्केच झाली असून प्रशासन जी आकडेवारी देत आहे ती रतन खत्रीचे आकडे असल्याचा आरोप भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. २५ वर्षांच्या सत्तेनंतर मुंबईकरांना सुरक्षेची हमी देऊ शकत नसतील तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी असे देखील शेलार म्हणाले.

आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील पाहणी दौरा गुरुवारी केला. पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यासह आपल्या भाजप नगरसेवक सहभागी झाले होते. यात मालाड येथील वलनाई, जुहू येथील एसएनडीटी तर कुर्ला येथील मिलिंद नगर नाल्यावर जाऊन कामाची पाहणी करण्यात आली. या तिन्ही ठिकाणी भयावह चित्र असून नाल्यामध्ये गाळाचे ढिगारे पहायला मिळत आहेत. दरम्यान या दौऱ्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदनही दिले आहे.

ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात, पूर्ण होऊ शकतात, नियोजन होऊ शकते अशा गोष्टी सुद्धा पालिका प्रशासन जाणून-बुजून करताना दिसत नाही. टाळाटाळ केली जाते आहे. हा कुठला कट आहे? असे शेलार म्हणाले. आम्ही आज पालिका आयुक्तांना भेटणार असे कळताच पालकमंत्र्यांनी धावाधाव करून ते आयुक्तांना भेटून गेले. एवढे दिवस हे कोठे होते? असा सवाल करत शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान पावसाळ्यापूर्वी करावी लागणारी वृक्ष छाटणी अद्याप झालेली नाही. दरडी कोसळणे, झाडे कोसळणे, मोडकळीस आलेल्या इमारती याबाबतचे नियोजन करण्यात आलेले नाही. याबाबत गुरुवारी बैठक झाली असे पालिका आयुक्तांनी सांगितले. हे सर्व पाहता पालिका प्रशासनाचा निद्रानाश कसा होणार आणि कधी होणार? हाच एक प्रश्न आहे. मुंबईमध्ये पावसाळ्यात जी परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासनाची दिरंगाई आणि सत्ताधारी शिवसेनेचे पळकाढू धोरण जबाबदार असेल, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -