शहापूर (वार्ताहर) : निसर्गाचे वरदान लाभलेल्या शहापूर तालुक्यात गेल्या काही वर्षापासून विविध प्रकल्प, गृहप्रकल्प, विकली होमच्या नावाने नैसर्गिक टेकड्या, नाले बुजवून निसर्गातील जैवसृष्टीचे अपरिमित नुकसान होत आहे. नदीपात्रापासून नजीक असलेल्या विविध उद्योगातून निघणारे सांडपाणी, घनकचरा नदीपात्रात टाकून पाणी प्रदूषित करत आहेत़ पर्यावरण संर्वधनाचे सर्व नियम पायदळी तुडवून पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे़.
एकीकडे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी शासनाने कडक धोरण अवलंबले असतांना जलसंपदा विभाग व महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे नदीपात्रालगत मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. परिणामी नदीनजिकच्या भागातील रहिवासी भागातील सांडपाणी, कचरा टाकून नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
अनेकदा पर्यावरण क्लिंअरेन्स न घेता तालुक्यात प्रदूषण करणारे अनेक उद्योग सुरू आहेत. बंदी असूनही कंपन्या, नगरपंचायत ग्रामपंचायती उघड्यावर कचरा टाकून जाळत आहेत, तर नदी पात्रात कचरा टाकून नदी प्रदूषित करत आहेत. प्रचंड प्रमाणात अवैध प्लास्टिक वापर सुरू आहे. तालुक्यात पर्यावरण हा विषय कोणीही गांभीर्याने घेत नाही. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अनेक कारखाने उद्योग व्यवसायांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागते.
मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त परवानग्या देते. परंतु त्यातील अटीशर्थी व प्रतिबंधाचे व्यवसायिक उल्लंघन करत असताना तक्रार करूनही अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे.