Sunday, July 6, 2025

अर्ज केला, पैसे भरले मात्र राहावे लागते अंधारात

अर्ज केला, पैसे भरले मात्र राहावे लागते अंधारात

वीज मीटरसाठी ग्राहकांचे हेलपाटे


सफाळे (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील सफाळे महावितरण विभागाकडे गेल्या काही महिन्यांपासून वीजमीटर नसल्याने ग्राहकांवर महावितरण कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांना नाहक फटका सहन करावा लागत आहे. विद्युत मीटरसाठी येथील ग्राहकांनी जानेवारीपासून अर्ज केले आहेत. मात्र कार्यालयात मीटरच उपलब्ध नसल्याने खेडोपाड्यातील ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.


विद्युतवाहिनीवर आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यावर सफाळे महावितरण विभाग कारवाईसाठी तत्पर असते. तर दुसरीकडे विद्युत मीटरच उपलब्ध नसल्याने ग्राहकांवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना आकडा टाकून वीज घ्यावी लागते. एकंदरीतच सफाळे महावितरण विभागाने त्वरित वीज मीटर उपलब्ध करावे आणि सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी केली जात आहे. सफाळे विभागातील अनेक नवीन ग्राहकांना वीजपुरवठा मिळण्याची तातडीने गरज आहे. त्यानुसार ग्राहकांनी अर्ज दाखल करून वीजजोडणीचे आवश्यक ते पैसे वीज कंपनीकडे भरणा केलेला आहे. मात्र मीटर उपलब्ध नसल्याने मीटरची जोडणी शक्य नसल्याचे उत्तर सतत ग्राहकांना मिळत आहे.


गेल्या काही महिन्यांपासून वीजमीटर उपलब्ध नसल्याने मीटर बसविणे शक्य होत नाही. डिसेंबरपर्यंत ज्या ग्राहकांनी अर्ज केले होते त्यांना मीटर दिले आहेत. तसेच नवीन वीजमीटर उपलब्ध झाल्यास उरलेल्या ग्राहकांना त्याचा तात्काळ पुरवठा करण्यात येईल.- अनिरुद्ध बैतुले, उपविभागीय अभियंता, सफाळे महावितरण.

Comments
Add Comment