केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी पुण्यात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. पुण्यातील जे. डब्ल्यू. मेरियट हॉटेलमध्ये स्मृती इराणी उतरल्या असल्याची माहिती मिळताच महिला कार्यकर्त्यांनी पोलीस बॅरिकेट ओलांडून आत प्रवेश केला. इराणी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. २०१४ साली यूपीएची केंद्रात सत्ता असताना स्मृती इराणी यांनी जी फलकबाजी आणि घोषणा केल्या होत्या, त्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न या महिला कार्यकर्त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या अचानक झालेल्या या आंदोलनानंतर भाजप पदाधिकारीसुद्धा आक्रमक झाले. त्याच्यात झटापट झाली. मात्र एवढ्या गोंधळ आणि तणावाच्या वातावरणानंतर बालगंधर्व सभागृहात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात स्मृती इराणी यांनी शांतपणे आणि संयमाने आपले भाषणही केले. एवढेच नव्हे तर स्मृती इराणी यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलेली प्रतिक्रियाही राष्ट्रवादीला झोंबणारी आहे. अमेठीचा कधीही न हारणारा बालेकिल्ला आपण जिंकला. त्यामुळे बारामतीत स्मृती इराणी आल्या, तर काय होईल, अशी चिंता असल्याने त्यांनी गोंधळ घातला, असे सांगून त्या निघून गेल्या.
केंद्रीय मंत्र्यांचा राज्यात कुठे कार्यक्रम असतो त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे तो सुरळीत पार पाडावा, याची जबाबदारी राज्यातील पोलीस खात्यावर असते. राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेच्या वाट्यात गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, केंद्रातील मंत्री यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही गृहखात्यावर असते; परंतु गेल्या काही दिवसांत पाहिले, तर गृहखाते कोण चालवते, त्याच्यावर कोणाचा अंकुश आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी उदाहरणे समोर दिसत आहेत. महागाईविरोधात राष्ट्रवादीला आंदोलन करायचे होते, तर त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास कोणाची अटकाव होती. महागाईच्या नावाने केंद्र सरकारवर केवळ ठपका ठेवायचा, असे ऊठसूठ गल्लीतील नेतेही आता बोंबलायला लागले आहे. ना जीडीपीचा अभ्यास, ना अर्थशास्त्रातले काही कळत, ना जागतिक पातळीवरील परिस्थितीचे अवलोकन. तो बोलला म्हणून हा बोलला, अशी काही नेत्यांची स्थिती आहे. असो. या विषयावर त्यांना आंदोलन करायचे असेल, तर त्यांनी करावे. मात्र एखाद्या केंद्रीय मंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम राज्यात असताना ते गोंधळ घालू नये. त्यातून महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस नेण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत.
दुसरे एक ताजे उदाहरण म्हणजे अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावरील शाईफेक प्रकरण. ५० वर्षांपेक्षा अधिक काळ राजकीय प्रदीर्घ असलेल्या शरद पवार यांच्याबाबतची एक पोष्ट व्हायरल झाली. त्यातून केतकीला पोलिसांनी अटक केली. ज्या पद्धतीने शरद पवार यांच्याबाबतीत घाणेरडे लिखाण करणारी कविता लिहिली त्याचा निषेध करायला हवा. त्यामुळे अर्थात पोलिसांनी जी कायद्यानुसार कारवाई केली त्याच्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र पोलीस आरोपी असलेली केतकी पोलिसांच्या ताब्यात असताना तिच्यावर अंडी फेक, शाईफेक करण्याची काय आवश्यकता होती. आपल्या नेत्याबद्दल कोणी काही अपशब्द वापरले, तर कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक होतो, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत; परंतु पोलिसांच्या गराड्यातील केतकीला मारहाण करण्याचा प्रयत्न करणे हे कितपत योग्य आहे. गृहमंत्री तुमच्या पक्षाचा असल्याने साहजिकच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही सत्ताधारी राष्ट्रवादी पार्टीची अधिक असताना, रस्त्यावर आक्रमता दाखवून काय साधले जाणार आहे, याचा आता विचार करण्याची आवश्यकता आहे. चित्रपटसृष्टीतील काही महिला कलाकार मंडळींही वादग्रस्त विधाने, बोल्ड सीन देऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात.
केतकी चितळेही अशा वादग्रस्त गोष्टींमुळे या आधी प्रकाशझोतात राहिली आहे. मात्र अशा अभिनेत्रीबद्दल सजग प्रेक्षकही सीरिअस नसतो. तरीदेखील केतकीच्या फेसबुक पोस्टला का महत्त्व दिले गेले?, या पोस्टकडे दुर्लक्ष करताना आले असते का? कारण जी फेसबुक पोस्ट अॅड. भावे नावाच्या व्यक्तीची होती, ती केतकीने फॉरवर्ड केली होती. पवारांच्या आजाराचे विडंबन करणारी ही पोस्ट दोन वर्षांपूर्वीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे समजते. त्यामुळे पोस्ट टाकणारी भावे नावाची व्यक्ती नक्की खरी की खोटी आहे. ही पोस्ट केतकीपर्यंत कशी आली? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिची संगणक सामग्री जप्त केली आहे. पोलीस त्यांचा शोध घेतील; परंतु केतकीच्या या प्रकरणानंतर सोशल माध्यमावर अनेक अश्लील कॉमेंट्स येत आहेत, त्याला कोण आवर घालणार?
आता पोलिसांनी कोण काय बोलला याचा शोध घेण्यासाठी तपास कामाची शक्ती वाया घालवायची का? आता या सर्व गोष्टीचा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विचार करण्याची गरज आहे. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल, त्याची चूक झाली असेल, तर पोलीस खाते त्यावर कारवाई करेल; परंतु अशा प्रकरणावरून रस्त्यावर हुल्लडबाजी करून काय साध्य होणार आहे. मुंबई राणा दाम्पत्याच्या प्रकरणावरून शिवसेनेने मातोश्रीबाहेरील रस्ते बंद केले होते. वाहतुकीची कोंडी निर्माण केली होती. तसाच प्रकार राष्ट्रवादीच्या मंडळींनी सध्या सुरू केला आहे. आता महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते काम करणार असतील, तर दोष दुसऱ्याला देऊ नका.