Wednesday, April 30, 2025

महामुंबईराजकीय

पवारांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद

पवारांच्या आशीर्वादाने राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, माजी आमदार नरेंद्र पवार, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश चर्चा प्रतिनिधी प्रेरणा होनराव आदी यावेळी उपस्थित होते.

अंतर्गत सत्तासंघर्षातून आलेल्या वैफल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन चालविलेला धुडगूस आणि दहशतवाद तातडीने थांबवून कायद्याला त्याचे काम करू द्यावे, असा सल्लाही उपाध्ये यांनी दिला. गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याच्या सूचना राज्याच्या गृहखात्याकडूनच पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, असा आरोप करून, संयमी राजकारण करणारे शरद पवार यांचे मौन त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत असल्याची शंका उपाध्ये यांनी व्यक्त केली.

आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सत्ताधाऱ्यांच्या प्रोत्साहनातून ठिकठिकाणी कायदा हातात घेऊन दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारकडूनच अशा प्रकरणांतील गुन्हेगारांना संरक्षणही मिळत असल्यामुळे सामान्यांचा शांततेने जगण्याचा हक्कच संपुष्टात आला आहे. पोलीस यंत्रणेस वेठीला धरून सत्ताधारी पुरस्कृत दहशतवादामुळे अशांतता माजली असून विरोधकांना दहशतीच्या मार्गाने संपविण्याचा डाव सत्ताधारी पक्षाने आखला असल्याचे उपाध्ये म्हणाले.

Comments
Add Comment