Friday, October 24, 2025
Happy Diwali

दिल्लीचे विजयाक्षर

दिल्लीचे विजयाक्षर

नवी मुंबई (वृत्तसंस्था) : शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, आणि कुलदीप यादव या गोलंदाजांच्या तिकडीची धावा रोखणारी आणि बळी मिळवणारी कामगिरी सोमवारी पंजाबविरुद्ध दिल्लीच्या विजयात मोलाची ठरली. मिचेल मार्शने संयमी खेळी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. या सामन्यातील विजयामुळे दिल्लीच्या खात्यात १४ गुण झाले असून त्यांनी चौथ्या स्थानी झेप घेतली. दरम्यान या सामन्यातील पराभवामुळे पंजाबचे प्ले-ऑफ प्रवेशाचे स्वप्न जवळपास भंगले आहे.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या पंजाबला त्यातल्या त्यात बरी सुरुवात करता आली. दिल्लीला पहिल्या विकेटसाठी ३८ धावांपर्यंत वाट पाहावी लागली. वेगाने धावा काढत असलेल्या बेअरस्टोला लगाम घालण्यात त्यांना यश आले. नॉर्टजेने १५ चेंडूंत २८ धावा जमवलेल्या बेअरस्टोचा अडथळा दूर करत पंजाबला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पंजाबच्या फलंदाजीला गळती लागली. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल, कुलदीप यादव या फिरकीपटूंच्या जोडीने दिल्लीच्या फलंदाजीचा कणाच मोडला.

शार्दुल ठाकूरला धावा रोखण्यात तितके यश आले नसेल तरी बळी मिळवण्यात तो चांगलाच यशस्वी ठरला. एका बाजूने जितेश शर्मा धावा जमवत होता, मात्र दुसऱ्या फलंदाजाची त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे जितेश मैदानात असेपर्यंत विजयाच्या आशा जिवंत असलेला पंजाबचा संघ तो बाद होताच पराभवाच्या दिशेकडे झुकला. दिल्लीच्या अक्षर पटेल-कुलदीप यादव या जोडीने अप्रतिम गोलंदाजी केली. अक्षरने ४ षटकांत अवघ्या १४ धावा देत २ बळी मिळवले. तर कुलदीपने ३ षटकांत १४ धावा देत २ बळी मिळवले. शार्दुल ठाकूरने ४ षटकांत ३६ धावा देत ४ बळी मिळवले. त्यामुळे पंजाबला २० षटकांत १४२ धावांपर्यंतच मजल मारता आली.

तत्पूर्वी मिचेल मार्शच्या धडाकेबाज खेळीमुळे दिल्लीने २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १५९ धावा केल्या. मार्शने ४८ चेंडूंत ६३ धावा केल्या. त्याला सर्फराज खान आणि ललीत यादव यांनी चांगली साथ दिली. सर्फराजने १६ चेंडूंत ३२ धावांचे योगदान दिले, तर ललीत यादवने २१ चेंडूंत २४ धावांची कामगिरी केली. खराब सुरुवात करूनही मार्श, सर्फराज आणि ललीत यादवच्या खेळीमुळे दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पंजाबच्या लिविंगस्टोन, राहुल चहर, अर्शदीप सिंग यांनी प्रभावी गोलंदाजी केली. लिविंगस्टोनने ४ षटकांत २७ धावा देत ३ बळी मिळवले, तर राहुल चहरने ४ षटकांत अवघ्या १९ धावा दिल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा