Friday, July 19, 2024
Homeक्रीडाहैदराबादची नाडी आता मुंबईच्या हातात...

हैदराबादची नाडी आता मुंबईच्या हातात…

‘प्ले-ऑफ’मध्ये टिकून राहण्यासाठी सनरायझर्सला विजय हवाच

मुंबई (प्रतिनिधी) : इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या अंधुक आशा जिवंत ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मंगळवारच्या सामन्यात सलग पाच पराभवांचा सिलसिला तोडावा लागेल. मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव झाल्यास सनरायझर्सच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या शक्यता मावळतील.

सनरायझर्सने सलग पाच सामने जिंकल्यानंतर सलग पाच सामने गमावले आहेत. जर त्यांनी आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तर त्यांचे १४ गुण होतील; परंतु प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना इतर संघाच्या सामन्यांमध्येही अनुकूल निकाल मिळावा यासाठी त्यांना प्रार्थना करावी लागेल. जर वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर अंतिम चारच्या स्पर्धेतून ते निश्चितच बाद होतील, कारण प्लेऑफच्या या शर्यतीत इतर ७ संघाचे १२ किंवा त्याहून अधिक गुण आहेत.

हैदराबादला फलंदाजीत चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. कर्णधार केन विल्यमसनला यंदाच्या मोसमात धावा करण्यासाठी झगडावे लागत आहे. त्याने १२ सामन्यांत केवळ २०८ धावा केल्या आहेत. त्याचा सलामीचा जोडीदार आणि मागील सामन्यात ४३ धावा करणाऱ्या अभिषेक शर्माला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करावे लागेल. मात्र, वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर मुंबईच्या फॉर्मात आलेल्या भक्कम आक्रमणातून त्यांच्यासमोरचे आव्हान खडतर असेल.

सनरायझर्सकडे राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम आणि निकोलस पूरन यांच्या रूपाने मधल्या फळीत चांगले फलंदाज आहेत. मात्र त्यांना आपल्या खेळात सातत्य राखावे लागेल. शेवटच्या सामन्यात त्यांची मधली फळी योग्य कामगिरी करू शकली नाही, ज्यामुळे त्यांना कोलकाता नाईट रायडर्सने ५४ धावांनी पराभूत केले. ‘फिनिशर’ म्हणून वॉशिंग्टन सुंदर आणि शशांक सिंग यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. मात्र, उमरान मलिक, भुवनेश्वर कुमार, मार्को यानसेन आणि यॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजन यांच्यासह सनरायझर्सची गोलंदाजी मजबूत आहे.

दुसरीकडे, मुंबईच्या फलंदाजांना या वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर विशेषतः मलिकपासून सावध राहण्याची गरज आहे, ज्याने वेगवान गोलंदाजी करत आतापर्यंत १८ बळी घेतले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईने गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावलेले आहे. मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. मोठी खेळी कारण्यात ते असमर्थ ठरत आहेत. दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत या दोघांनाही अधिक जबाबदारी स्वीकारून संघाला आक्रमक सुरुवात करून द्यावी लागणार आहे. तुलनेने कमी अनुभवी असलेल्या तिलक वर्माने मधल्या फळीची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स आणि रमणदीप सिंग यांसारख्या फलंदाजांना सनरायझर्सच्या गोलंदाजांचा सामना करणे सोपे जाणार नाही.

मुंबईकडे गोलंदाजीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरासह सॅम्स सुरुवातीला विकेट घेण्यात माहीर आहे. त्याने गत सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. सोबतच फिरकीपटू कुमार कार्तिकेय सिंग आणि रिले मेरेडिथ देखील मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत आहे. मुंबईसाठी फार महत्त्वाचा नसला तरी हैदराबादसाठी विजय आवश्यक आहे. नाही तर या एका पराभवामुळे सनरायझर्सचा सूर्य उगवण्याआधीच मावळतीला गेलेला असेल.

ठिकाण : वानखेडे स्टेडियम वेळ : रात्री ७.३० वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -