पुणे (हिं.स.) यंदा मान्सूनच्या आगमनामुळे कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्यात आहे. मे अखेरपर्यंत बाजारात आवक होईल, त्यानंतर आवक घटत जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आणखी सुमारे पंधरा दिवस हापूसची चव चाखता येईल. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारात हापूसचे दर आवाक्यात आहेत. किरकोळ बाजारात डझनाचा दर ३०० ते ६०० रुपये असा आहे.
तापमान, ढगाळ वातावरण, वादळ आणि अवकाळी पावसाच्या भितीने कोकणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी हापूस बाजारात पाठवत आहेत. आवक वाढल्यामुळे हापूसच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. घटलेले दर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी पंधरा दिवस कोकणातील हापूसची चव चाखता येईल. त्यानंतर मात्र गावरान हापूस बाजारात दाखल होण्यास सुरूवात होईल.
हवामान बदलामुळे यंदा हापूस आंब्यांच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. अवकाळी पाऊस, धुक्यामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हापूसची बाजारात आवक सुरू झाली. त्यानंतर मार्च महिन्यात हापूसची आवक नियमित झाली. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर चढे होते. आवकही अपेक्षेएवढी नव्हती. यंदाच्या हंगामात आंब्यांची आवक टप्प्याटप्प्याने होत गेली. आवक नियमित होत नसल्याने आंब्याचे दर चढे होते.