Wednesday, March 26, 2025
Homeअध्यात्मदेह हे परमार्थाचे साधन समजावे

देह हे परमार्थाचे साधन समजावे

संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे; तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे, म्हणजे विषय देणे हे नव्हे. जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे; ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहार्याकरिता उपयोगी पडतो. पण तो कितीही चांगला अणि उपयोगी असला, तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे. आतल्या खोबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे. पण मनुष्य ‘हा देहच मी आहे’ असे मानून व्यवहार करतो. वास्तविक, आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवित असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन, फार काय माझा जीव असेही म्हणतो; पण वागतो मात्र ‘मी तोच आहे’ असे समजून. देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो. असे न करावे.

आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी, दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत; पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते. देवावर प्रेम करायला, देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून, आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला, सगुणमूर्तीचे, सद्गुरूचे ध्यान करावे लागते. ते जसजसे दृढ होत जाईल, तसतसे आपण स्वतःला विसरून जातो; आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो, म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो. ‘मी देह’ म्हणावे, यापलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही. प्रपंचात संकटे येतात, तरी पण तो सोडावासा वाटत नाही; याहून भगवंताची माया ती कोणती? अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ, देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला, म्हणजे देहाचे ममत्व थोडे कमी होते. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमेश्वराचे होऊ. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे.

– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -