सावंतवाडी : शहरालगत असलेल्या माजगाव-मेटवाडा परिसरातील कठडा नसलेल्या ४० फूट खोल विहिरीत गव्याची दोन पिल्ले पडली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर वन विभागाचे अधिकारी, स्थानिकांच्या मदतीने त्या दोन्ही पिल्लांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी परिसरात गेले अनेक दिवस गव्यांचा वावर आहे. नरेंद्र डोंगर परिसरात गव्यांचा वावर असतो. दरम्यान माजगाव-मेटवाडा परिसरात एक कठडा नसलेली विहिर आहे. या विहिरीचा अंदाज न आल्यामुळे गव्याची दोन पिल्ले विहिरीत पडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी गव्याची पिल्ले बघण्यासाठी गर्दी केली.
वनविभागाला याबाबत माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, सागर भोजने, रामचंद्र रेडकर यांची रेस्क्यू टीम स्वतः विहिरीत उतरली व त्यांनी या दोन पिलांना दोरीच्या सहाय्याने बांधून वर काढले. या सर्व बचावकार्यत माजगाव मधील स्थानिक नागरिकांची मोलाची मदत लाभली. या बचावकार्यात वनपाल प्रमोद सावंत, प्रमोद राणे, वनरक्षक वैशाली वाघमारे, प्रकाश पाटील, अप्पा राठोड, वनमजुर सावंत वाहनचालक रामदास जंगले या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. विहिरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर दोन्ही पिल्लांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.