Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमीनॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन

नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन

शिबानी जोशी

निर्माणों के पावन युग मे हम चरित्र निर्माण न भुले स्वार्थ, साधना की आंधी मे वसुधा का कल्याणा न भुले।

वैद्यकीय प्रोफेशनलच्या संपूर्ण कल्याणासाठी विशेषतः एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या व्यावसायिकांच्या मूलभूत प्रश्नावर काम करण्यासाठी तसेच वेळोवेळी वैद्यकीय क्षेत्रात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर काम करण्यासाठी, ॲलोपॅथी डॉक्टरांमध्येही राष्ट्रीय भावना तसेच चारित्र्य, प्रामाणिकपणे काम करण्याची भावना निर्माण व्हावी, मेडिकल, डेंटल महाविद्यालयामध्ये विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये नातं निर्माण व्हावे. डॉक्टरांनी समाजसेवेतही योगदान द्यावं म्हणून नॅशनल मेडिको ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघाची संघटना सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे; परंतु त्यात मेडिकलला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची एक संघटना असावी असं लक्षात आलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या २३व्या राष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक मेडिकल स्टुडंट सहभागी झाले होते. त्या वेळी वैद्यकीय शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची एक वेगळी संघटना स्थापन व्हावी असा निर्णय झाला. आणि रांचीमध्ये १९७७ला एनएमओची आैपचारिक स्थापना झाली. सर्वात प्रथम नागपूरचे डॉक्टर आबाजी थत्ते हे पालक अधिकारी होते. थत्ते यांनीच ही संघटना स्थापन करावी यासाठी पुढाकार घेतला होता. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय चारित्र्य निर्माण, देशभक्ती, बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी एनएमओतर्फे मेडिकल कॉलेज स्तरावर कार्यक्रम आयोजित केले जातात. खरंतर ॲलोपॅथी डॉक्टरांच्या आयएमओसारख्या अनेक संघटना आहेत; परंतु डॉक्टरांनासुद्धा काही सामाजिक कार्य करण्याची इच्छा असते अशा डॉक्टर्स आणि मेडिकल विद्यार्थ्यांना या संघटनेतून सामाजिक कार्य करता येते.

मेडिकल कॉलेजमध्ये आपण बऱ्याचदा, चित्रपटातही पाहतो तसे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी रॅगिंगचे प्रमाण खूप मोठे होते. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ विद्यार्थ्यांकडून त्रास दिला जात असे. मेडिकलसारख्या पवित्र व्यवसायामध्ये येण्याची सुरुवात चांगली व्हावी यासाठी एनएमओने यावर एक तोडगा काढला. नूतन छात्र अभिनंदन असा उपक्रम मेडिकल कॉलेजमध्ये सुरू केला. नवीन अॅडमिशन घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचे जुने विद्यार्थी स्वागत करतात आणि त्यामुळे आपोआपच त्यांच्यामध्ये सहचार्याचे नाते निर्माण होतं. मेडिकल स्टुडंट्सना हिपोक्रेटिक ओथ दिली जाते. त्याच धर्तीवर एनएमओ मेडिकल विद्यार्थ्यांना चरक शपथ देते. म्हणजे ऋषी चरक यांनी वैद्यकीय व्यवसायात काय करायला हवं त्याची मांडणी केली आहे त्याबाबतची ती शपथ असते. असे महाराष्ट्र प्रांताचे संघटन सचिव चौधरी यांनी सांगितलं.

एनएमओच्या नवीन सभासदांना प्रशिक्षित करण्यासाठी अभ्यास वर्ग दर वर्षी देशभरातल्या शाखांतर्फे आयोजित केले जातात. ईशान्येकडील सात राज्य विकासापासून दूर असल्याचे लक्षात आल्यानंतर २००३ सालापासून या भागात धन्वंतरी सेवा यात्रा काढण्याचे ठरल आणि तिथे मेडिकल कॅम्प आयोजित केले जाऊ लागले आहेत. त्यात देशभरातून दीडशे डॉक्टर्स आणि काही मेडिकल स्टुडेंट्स सहभागी होतात. जवळजवळ सात ते आठ हजार लोकांचे चेकअप यावेळी केले जाते. ईशान्येकडील लोकांना उर्वरित भारताशी जोडण्यासाठी हा उपक्रम खूपच उपयोगी ठरत आहे. यासाठी मिलिटरीचे जवानही मदत करतात. एका गावात गेले की, आसपासच्या पाच-सहा गावांतील लोकांचे चेकअप तिथे केले जाते.

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी दर वर्षी राष्ट्रीय परिषद देशातील विविध शहरांमध्ये आयोजित केली जाते. कंनेक्ट, नेटवर्क, अपडेट हे या परिषदेचे मूळ
हेतू आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये २०१३ साली ऋषी कश्यप सेवा यात्रा ही सुरू झाली आहे. तिथेही दीडशे डॉक्टर ८ दिवसांचा कॅम्प करतात. जम्मू-काश्मीरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी एनएमओने लडाखसह त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प आयोजित करून वैद्यकीय सेवा पुरवली होती.

नॅशनल डॉक्टर्स डेच्या दिवशी देशभरात एनएमओ कार्यक्रम आखत असते. देशभरात असलेल्या संघचालकांच्या मदतीने एनएमओ मेडिकल कॅम्प आयोजित करते. वंचित आणि तळागाळातल्या लोकांना या कॅम्पमध्ये मेडिकल चेकअप करून गरज असेल त्यांना शहरातील मोठ्या रुग्णालयातही पाठवलं जातं.

तरुण वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी पिकनिकला सारखाच जात असतो; परंतु एखाद्या ग्रामीण आड परिसरामध्ये वैद्यकीय सेवा पुरवली, तर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंदही या विद्यार्थ्यांना मिळतो आणि सेवा पुरवण्याचाही आनंद मिळतो. त्यामुळे अशा ठिकाणी मेडिकल कॅम्प आयोजित केले जातात. शहरातल्या या मेडिकल विद्यार्थ्यांना अशा तऱ्हेचे आयुष्यही लोक जगत आहेत हे पाहायला मिळतो आहे. त्यांच्यामध्ये एक सामाजिक भान हे निर्माण होते, हासुद्धा एक हेतू या कामांमधून साध्य होत असतो.

सर्वदूर वैद्यकीय अवेअरनेस निर्माण व्हावा यासाठी वेळोवेळी एनएमओतर्फे विविध ठिकाणी रोड शोज, सायकल यात्रा, सहली काढल्या जातात. देशात जेव्हा जेव्हा पूर, भूकंप, गारपीट अशा आपत्ती निर्माण होतात, त्या काळात आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात एनएमओ सभासद नेहमीच मदत करत असतात.

“स्वास्थ्य सेवा से राष्ट्रसेवा” एनएमओचे ध्येय वाक्य आहे. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आरोग्यविषयक प्रश्न सुद्धा आयएएस अधिकारीकडेच असतात; परंतु वैद्यकीय क्षेत्र हा खूप वेगळा भाग आणि समाजाच्या आरोग्याशी निगडित असलेला भाग असल्यामुळे यासाठी एक वेगळे बोर्ड करावे आणि इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसप्रमाणेच इंडियन मेडिकल सर्विसेस असा दर्जा निर्माण करावा, जिथे फक्त डॉक्टर्स पोस्ट होतील आणि ते आरोग्याशी संबंधित हेल्थ पॉलिसी, निर्णय घेऊ शकतील, अशी एनएमओची एक सूचना सरकारला आहे. बऱ्याच वेळा काही ठिकाणी सरकारी सुविधा वाया जातात, तर काही ठिकाणी त्या पोहोचत नाहीत. एक वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी जर प्रत्येक भागाला मिळाला, तर या वैद्यकीय सुविधा नसते समसमान सुसूत्रीकरण होऊ शकेल, असे एनएमओला वाटते.

कोरोना काळातही एनएमओने अनेक ठिकाणी टेस्टिंग, मेडिकल कॅम्प आयोजित केले. पुण्यात सुरुवातीला जे जे रेडझोन होते, तिथे या डॉक्टरांनी जाऊन टेस्टिंगची कामे केली आहेत.

अशा तऱ्हेने एमबीबीएस आणि बीडीएस करणाऱ्या विद्यार्थी तसेच व्यावसायिकांची त्यांच्या मदतीसाठी तसेच समाजाच्या मदतीसाठी स्थापन केलेली ही संघटना देशभर वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत आहे

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम् ।
कामये दुःखतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम् ।।

(मुझे न राज्य की, न स्वर्ग की, न मोक्ष की आकांक्षा है। मेरी आकांक्षा दुःख से तप्त प्राणिमात्र का दुःख दूर करने की है।) हा संघटनेचा मंत्र आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -