Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीऔरंगजेबचे थडगे जमीनदोस्त करण्याची मनसेची मागणी

औरंगजेबचे थडगे जमीनदोस्त करण्याची मनसेची मागणी

मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरुन सत्ताधारी शिवसेनेपासून ते विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपापर्यंत सर्वच प्रमुख पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान असे असतानाच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगजेबचे हे थडगे उद्धवस्त करण्याची मागणी केली आहे. राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत मनसेने ही मागणी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पक्षाची भूमिका मांडताना शिवसेनेला हिंदुत्ववादाच्या मुद्द्याचा संदर्भ देत हे थडगे उद्धवस्त करण्याची मागणी केली आहे. “१८ डिसेंबर २००० रोजी ‘सामना’मध्ये दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणतात, “संभाजीनगर येथे असलेले हे औरंगजेबाचे थडगे जमीनदोस्त झाले पाहिजे. तसेच पुन्हा बांधता कामा नये.” शिवसेनेचे हे सरकार आदरणीय बाळासाहेबांचे तरी ऐकणार आहे का? हे थडगे जमीनदोस्त होणार आहे का?” असे प्रश्न मनसेने उपस्थित केले आहेत.

तसेच पुढे बोलताना हे थडगे काय अकबरूद्दीन औवेसींसारख्यांना नतमस्तक होण्यासाठी ठेवले आहे का, असा सवाल मनसेने थेट औवेसींचा उल्लेख टाळत केला. “या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय आहे? ही निजामाची औलाद येथे येऊन या थडग्यावर नतमस्तक होणार. यासाठी हे थडगे ठेवले आहे का?,” असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला आहे.

“आपण संभाजी नगरच्या नामकरणावरुन पलटी मारलेली आहे. बाळासाहेबांनी सांगितलेल्या रस्त्यावरील नमाज, भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवरुन पलटी मारलेली आहे. किमान बाळासाहेबांचे हे ऐकून या शिवरायांच्या महाराष्ट्रात हे थडगे आपण तोडून टाकणार आहात का?, हा आमचा नेमका सवाल आहे. असली नकलीच्या गप्पा मारणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी आता आपला चेहरा दाखवूनच द्यावा, असे आम्ही आव्हान देतो,” असेही काळे यांनी म्हटले आहे.

या अनुषंगाने बोलताना माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी, शाळा बांधताय याबद्दल अभिनंदन, पण औरंगजेबाच्या कबरीसमोर नस्तमस्तक होणे ही कृती तेढ निर्माण करणारी असल्याचे म्हटले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -