ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून काही अंशी वाढ होत असल्याचे दिसून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून पालिका क्षेत्र त्याच प्रमाणे ग्रामीण क्षेत्रात १० हजार लिटर क्षमतेच्या १४ प्राणवायूंच्या टाक्यांची सोय करण्यात आली असून आरोग्य आणीबाणीच्या प्रसंगी या टाक्या मुबलक प्राणवायूची निकड पूर्ण करतील, असा विश्वास जिल्हा आरोग्य विभागाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांना सज्जतेचे आदेश देण्यात आले असून अतिदक्षता विभागांतील खाटांची संख्या वाढवण्याचे काम जिल्हा आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्यास मोठ्या प्रमाणावर प्राणवायूची गरज लागू शकते म्हणून मोठ्या प्रमाणावर प्राण वायूची उपलब्धता करून ठेवण्यात येत आहे.
फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमालीची घट झाली होती. एप्रिल महिन्यात अवघ्या २६९ बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. परंतु मागील १२ दिवसांची आकडेवारी काळजी वाढवणारी आहे. या कालावधीत २५० रुग्णांच्या आसपास बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येताच खबरदारीचा उपाय म्हणून प्राणवायू त्याचप्रमाणे बालक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी खाटांचे नियोजन करण्यास आरोग्य यंत्रणेने सुरुवात केली आहे. निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोनाला अटकाव करायचा असेल तर नागरिकांनी सजग असणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनी दक्ष राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.