Friday, June 13, 2025

जोकोविचची इटली ओपन चषकावर मोहोर

जोकोविचची इटली ओपन चषकावर मोहोर

रोम (वृत्तसंस्था) : जगातील अव्वल दर्जाचा खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविचने रविवारी इटली ओपनच्या अंतिम सामन्यात स्टेफानोस सितासिपासला ६-०, ७-६ असे पराभूत करत सहाव्यांदा किताब आपल्या नावे केला. जोकोविचचे यंदाच्या वर्षातील हे पहिलेच विजेतेपद आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी लसीकरणावरून वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर काही काळ जोकोविच स्पर्धांपासून दूर होता.


जोकोविचने १ तास ३७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सितासिपासला दोन्ही सेटमध्ये सहज पराभूत केले. त्याने पहिला सेट ६-० असा जिंकला. त्यानंतर दुसरा सेटही ७-६ असा जिंकला. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला जोकोविच बॅकफुटवर होता. सितासिपासने संधीचा फायदा घेत ३-१ अशी आघाडी घेतली होती.


जोकोविचने पुनरागमन करत पहिल्या दोन्ही सर्विस जिंकत स्कोर ३-५ असा नेला. त्यानंतर बरोबरी करत ट्राय ब्रेकरमध्ये सेट जिंकला. जोकोविचने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कास्पर रूडवर विजय मिळवत कारकीर्दीतील १०००वा विजय मिळवला.

Comments
Add Comment