Monday, July 15, 2024
Homeकोकणरायगडउरण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्ट कारभार

उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्ट कारभार

पंचायत सदस्य, सरपंच, अधिकारी वर्गाचे आर्थिक हितसंबंध

माहितीच्या अधिकाराखाली माहिती देण्यास टाळाटाळ

उरण (वार्ताहर) : ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे, निधीचा अपहार करणे, मूळ दस्तावेजामध्ये बनावट कागदपत्रांचा समावेश करणे, असा उद्योग करणाऱ्या सरपंचाला आता तुरुगांची हवा खावी लागणार आहे. भ्रष्ट ग्रामसेवक व सरपंचाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम त्याच्याकडून वसूल करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीला दिला आहे.

तशाप्रकारची कारवाई नुकतीच कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत सरपंच दीपिका जंगले यांच्याबाबत केली. त्यांचे सरपंचपद हे कोकण आयुक्तांनी अपात्र ठरविले आहे. परंतु उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कारभार भ्रष्ट असून जनतेने मागणी करूनही उरणमधील पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

उरण तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, ग्रामसेवक अवैध अशी कामे करत आहेत. काही कंपनी किंवा खासगी मालकाकडून कामासाठी लाखो रुपये घेऊन पुन्हा ग्रामपंचायतमधून बिले काढण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व कामांची माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता मुदत संपून दोनदा अपील करूनही उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये येणारा मुद्रांक शुल्क, १४ व १५ व्या वित्त आयोगाचा लाखों रुपयांचा निधी हडप करणे, दरवर्षी एकाच जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करून आलेला निधी त्यासाठी शेजारील कंपनीकडून लाखो रुपये घेऊन खिशात घालणे, त्यातील किती झाडे जगली याची माहिती ना ग्रामपंचायत, ना पंचायत समिती यांना नाही. साहित्य खरेदीमध्येही लाखोंचा घोटाळा असून १० रुपयांची वस्तू ग्रामपंचायत १०० रुपयांनी खरेदी केल्याचे बिल ठेकेदाराकडून घेतात. साहित्य पुरविणारे ठेकेदार यांच्याकडे जीएसटी व व्हॅट न भरता ही बिले कशी पास होतात.

अशा प्रकारे भ्रष्टाचार करून ग्रामसेवक व सरपंच व त्यांना पाठिशी घालणारे अधिकारी वर्ग मालामाल झाले आहेत. काही ग्रामसेवक व सरपंच महाशयांनी आपल्याच नावाने बँकेतून लाखो रुपये काढल्याच्या नोंदी आहेत. तशा प्रकारच्या नोंदी आहेत. या नोंदी लवकरच जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. उरणमधील काही ग्रामपंचायतींचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येऊनही त्यावर ठोस निर्णय देण्यास जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रशासन टाळाटाळ करीत आहेत. ग्रामपंचायतमधील भ्रष्ट कारभार उघड होऊन त्यांना प्रोत्साहन देणारे कर्मचारी व सरपंच, सदस्य यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांची एकप्रकारे जिल्ह्यातील व तालुक्यातील अधिकारी वर्ग आर्थिक हितसबंधातून त्यांची पाठराखणच करीत असल्याचे चित्र उघड होते.

उरणमधील ग्रामपंचायतमधील लाखोंचा भ्रष्टाचारांच्या तक्रारी व पुरावे देऊनही उरण पंचायत समिती अधिकारी वर्ग यांच्याकडून कारवाई होत नाही, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी अशी कारवाई कधी करतील, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. याबाबत लवकरच उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाठिशी घालणाऱ्या उरण पंचायत समितीमधील अधिकारी वर्गांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पुरावे सादर करून दाद मागणार असल्याचे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -