Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीकार्ति चिदंबरमच्या ९ ठिकाणांवर सीबीआयची धाड

कार्ति चिदंबरमच्या ९ ठिकाणांवर सीबीआयची धाड

नवी दिल्ली (हिं.स.) : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या ९ ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी केली आहे. सीबीआयने आज, मंगळवारी सकाळी ६ वाजता ही धडक कारवाई केली. कार्ती चिदंबरम यांच्यावर अनधिकृतरित्या पैसे घेऊन चिनी नागरिकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने यासंदर्भात कार्ती चिदंबरम आणि वडील पी. चिदंबरम यांच्या चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, ओरिसा येथील सुमारे ९ ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने पी. चिदंबरम यांच्या जोरबाग आणि चेन्नई येथील निवासस्थानावरही छापे टाकले आहेत. सीबीआयच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. यात ते म्हणाले की, ‘मी मोजणी विसरलो, असे किती वेळा झाले? एक रेकॉर्ड असावा असे त्यांनी नमूद केलेय.

केंद्रीय तपास यंत्रणेने २०१०-१४ मध्ये गैरप्रकारे परदेशी निधी मिळवल्याचा आरोप करत कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सध्या कार्ती चिदंबरम यांची अनेक गुन्ह्यांशी संबंधित चौकशी सुरु आहे. यामध्ये एअरसेल-मॅक्सिस डील आणि आयएनएक्स मीडियाला ३०५ कोटी रुपयांचा परदेशी निधी प्राप्त करण्यासाठी विदेशी गुंतवणूक मंडळाच्या मंजुरीशी संबंधित अनेक गुन्हे प्रकरणांत अशांचा समावेश आहे. हा परदेशी निधी त्यांचे वडील पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना कार्ती यांना मिळाला होता.

सीबीआयने १५ मे २०१७ रोजी आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर नोंदवला होता. आयएनएक्स मीडिया समूहाकडून २००७ मध्ये विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (एफआयपीबी) मंजुरीमध्ये अनियमित व्यवहार करून ३०५ कोटी रुपयांचे परदेशी चलन मिळवले असल्याचा आरोप आहे. कंपनीला परकीय गुंतवणुकीची परवानगी मिळाली तेव्हा पी. चिदंबरम हे देशाचे अर्थमंत्री होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -