Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरजव्हार, मोखाड्यातील विद्युत सबस्टेशन कधी होणार सुरू

जव्हार, मोखाड्यातील विद्युत सबस्टेशन कधी होणार सुरू

  • पाच वर्षांपासून १३२ केव्ही केंद्रातून वीजपुरवठा नाहीच
  • तब्बल २१ कोटींचा खर्च, समस्या सोडविण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन

पारस सहाणे

जव्हार : जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात पावसाळ्यामध्ये विजेची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते. आदिवासी जनतेची विजेची समस्या दूर व्हावी या उद्देशाने जव्हारमधील जामसर येथे १३२/३३ केव्ही बोराळे व खोडाळा येथील २२ केव्ही उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र तेथील कामे अद्याप अपूर्ण आहेत. बोराळे येथे महा पारेषण कंपनीने सुमारे २१ कोटी रुपये खर्च करुन १३२ केव्ही विद्युतपुरवठा क्षमतेचे केंद्र सप्टेंबर २०१९ मध्ये तयार केले. मात्र ते तसेच धूळखात पडले आहे. आजतागायत तिथून कार्य सुरू झालेले नाही.

जव्हार व मोखाडा तालुक्यातील नव्याने बांधलेले विद्युत उपकेंद्र चालू करून नागरिकांची समस्या सोडवावी, याबाबत मोखाडा पंचायत समितीचे सदस्य प्रदीप वाघ यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात डहाळेवाडी येथे दीनदयाळ ग्रामीण ज्योती अंतर्गत नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटनाला ऊर्जामंत्री राऊत आले होते. वाघ यांनी निवेदनांबाबत माहिती दिल्यानंतर जव्हार, मोखाडा भागातील वीजसमस्या सोडविण्यासाठी अधिकारी वर्गाला सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. तसेच अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही देणार असल्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी वाघ यांना सांगितले.

परवानग्यांचा अडथळा…

जव्हार तालुक्यातील विजेची समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री विष्णु सवरा यांनी प्रयत्न केले. मात्र उभारलेल्या उपकेंद्राला ठेकेदार मिळत नाही, तर कधी वनविभागाच्या परवानग्या मिळाल्या नसल्याचे अधिकारी सांगतात. पाच वर्षे होऊन गेली मात्र जव्हार तालुक्याला मोठ्या क्षमतेच्या केंद्रातून वीजपुरवठा होऊ शकला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -