Thursday, July 10, 2025

वर्सोवा ही तर नवरत्नांची खाण : देवेंद्र फडणवीस

वर्सोवा ही तर नवरत्नांची खाण : देवेंद्र फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी) : अतिशय तडफदार, जनतेचे काम करणाऱ्या, जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडविण्याऱ्या वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या आमदार म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांची ओळख आहे. येथील मतदार त्यांना सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून का निवडून देतात याचे उत्तर या वर्सोवा गौरव पुरस्कारामधून मिळते. वर्सोवा ही तर नवरत्नांची खाणच असून दरवर्षी या पुरस्कार विजेत्यांची वाढ होतच जाते असे गौरवोद्गार विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोव्यात काढले.


वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यातर्फे वर्सोवा, जोगेश्वरी पश्चिम येथील सिटी इंटरनॅशनल शाळेजवळील म्हाडा मैदानामध्ये 'वर्सोवा महोत्सव २०२२' चे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. १३ ते २२ मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार व माजी मंत्री अॅड. आशिष शेलार, प्रसिद्ध संगीतकार अनू मलिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार डॉ. भारती लव्हेकर तसेच माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर व माजी नगरसेविका रंजना पाटील यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन झाले.


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, वर्सोव्यातील वेसावे हा विभाग हा इथल्या कोळी संस्कृतीने समृद्ध झालेला आहे. यांचे हे वैभव जपण्याची गरज आहे. म्हणून मुंबईमध्ये कितीही मोठ्या इमारती झाल्या, तरीही या कोळीवाड्यांचे डीमार्केशन अबाधित रहायलाच पाहिजे आणि त्याला संरक्षित करण्याचे काम आपले आहे. त्यासाठी मी, आशिष शेलार व भारती लव्हेकर आम्ही अनेक बैठका घेतल्या व हे डीमार्केशनचे काम करून घेतले आणि हे डीमार्केशन तसेच अबाधित राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.


या वर्षीचा २०२२ चा वर्सोवा गौरव पुरस्कार हा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते के. सी. बोकाडिया, अभिनेता व दिग्दर्शक श्रेयस तळपदे, प्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्य, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक शशी रंजन, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राकेश कमलाकर सारंग, ज्येष्ठ पत्रकार वैजयंती विनय आपटे, प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती सप्रू, प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव, जागतिक कुस्तीपटू संदीप यादव, प्रसिद्ध व्यावसायिक अझीझ पिरानी, प्रसिद्ध साउंड अल्केमिस्ट आशिष रेगो, प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन हिफजूर रहमान एम. कासम यांना देण्यात आला.

Comments
Add Comment