मुंबई (प्रतिनिधी) : गुजरातच्या ‘प्ले-ऑफ’मधील प्रवेशानंतर राजस्थान आणि लखनऊ यांच्यातील रविवारच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या सामन्यात राजस्थानने लखनऊला चीत करत त्यांचा ‘प्ले-ऑफ’मधील प्रवेश आणखी लांबवला. विजयामुळे राजस्थानने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेत ‘प्ले-ऑफ’च्या दिशेने पाऊल टाकले असून रेसमधील रंगत आणखी वाढवली आहे.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजी आलेल्या लखनऊच्या पहिल्या तीन फलंदाजांनी निराश केले. त्यामुळे संघ २९ धावांवर ३ फलंदाज बाद अशा अडचणीत सापडला. त्यानंतर दीपक हुडा आणि कृणाल पंड्या या जोडीने लखनऊला संकटातून सावरत धावगतीलाही वेग दिला. त्यामुळे संघाच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. मात्र कृणाल पंड्या आणि दीपक हुडा बाद झाल्यानंतर संघाच्या फलंदाजीला पुन्हा गळती लागली. पंड्याने २५ तर हुडाने ५९ धावांची कामगिरी केली. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसने एकाकी झुंज देत लखनऊचा विजय लांबवला. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. राजस्थानच्या ट्रेंट बोल्टने ४ षटकांत अवघ्या १८ धावा देत २ बळी मिळवले. राजस्थानने हा सामना २४ धावांनी जिंकला.
तत्पूर्वी राजस्थानला चांगली सुरुवात करता आली नसली तरी सांघिक फलंदाजीमुळे त्यांना १७८ धावांपर्यंत मजल मारता आली. जोस बटलरने राजस्थानच्या चाहत्यांना निराश केले. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि देवदत्त पडीक्कल यांनी धावा जमवल्याने बटलरच्या अपयशानंतरही राजस्थानच्या धावसंख्येला चाप लावणे लखनऊला जमले नाही. यशस्वीने २९ चेंडूंत ४१ धावा केल्या.
पडीक्कलने १८ चेंडूंत ३९ धावांचे योगदान दिले, तर संजू सॅमसनने २४ चेंडूंत ३२ धावा जमवल्या. विशेष म्हणजे लखनऊने त्यांच्या ताफ्यातील गोलंदाजांचा पुरेपूर वापर करून घेतला. त्यांनी ८ गोलंदाजांकडून गोलंदाजी करून घेतली. मात्र त्यातील एकाही गोलंदाजाला फारसा प्रभाव टाकता आला नाही. त्यातत्या त्यात आवेश खानने बरी गोलंदाजी केली. त्याने ३ षटकांत २० धावा देत १ बळी मिळवला. रवी बिश्नोईने ४ षटकांत ३१ धावा देत २ बळी मिळवले.