Monday, August 25, 2025

राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर

राज ठाकरे उद्यापासून पुणे दौऱ्यावर

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा उद्यापासून पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय रविवारी मनसेच्या पार पडलेल्या मेळाव्या संदर्भातदेखील राज ठाकरे या दौऱ्यामध्ये आढावा घेणार आहेत.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुढील महिन्यातील पाच तारखेला राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी पुण्यातील या दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जात आहे. तर, दुसरीकडे आगामी काही दिवसात पुण्यामध्ये राज यांची आणखी एक जाहीर सभा होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

नुकतीच मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ सभा पार पडल्या यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि फडणवीसांपाठोपाठ आता राज ठाकरेदेखील पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या सभेबाबत चर्चा होऊ शकते अशी शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर उत्तरसभेत आणि औरंगाबाद येथे पार पडलेल्या सभेतदेखील त्यांनी मनसे त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, राज यांच्या या भूमिकेनंतर पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. पुणे शहरातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यात मागील काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यामध्ये पुणे मनसेमधील खदखद दूर करण्याचा प्रयत्न करणार का? हे पाहणे देखिल महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >