बीकेसीवरील बकवास, निव्वळ भाजप व्देष

Share

गेल्या दोन वर्षांत कोविडची ढाल पुढे करून राज्याचे मुख्यमंत्री कधी जनतेसमोर थेट प्रकटले नव्हते. कोविड काळात आपल्या मर्जीतील लोकांना आणि आवडत्या ठेकेदारांना मोठमोठी कामे कशी मिळतील यावर मात्र त्यांचा कटाक्ष होता. एक दिवस त्या भ्रष्टाचाराचा स्फोट होणारच आहे व त्याचे भोग या सरकारला भोगावे लागणार आहेत. देशातील उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचे सगेसोयरे त्यांच्याभोवती कितीही आरत्या ओवळत असले तरी या राज्यात कोविड काळात दीड लाख लोक मरण पावले व लक्षावधी बेरोजगार होऊन रस्त्यावर आले या विषयी ते एक शब्दही बोलत नाहीत. मास्टर सभा म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सभेची मोठी जाहिरातबाजी करण्यात आली. टीव्ही वाहिन्यांवर तर काही दिवस रोज टिझर झळकत राहिले. मोठमोठी होर्डिंग्ज आणि गर्दी जमविण्याचे शिवसेना शाखांना टार्गेट यातून विक्रमी सभा घडविण्याची स्वप्ने बघितली गेली. मुख्यमंत्री राज्याच्या विकासाविषयी काय बोलणार, लोकांच्या प्रश्नांवर काय सांगणार याची उत्सुकता होती. प्रत्यक्षात भाजपवर अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यातच त्यांनी धन्यता मानली. भाजपला दूर ठेऊन आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करून मुख्यमंत्रीपद मिळवलेत ना, मग आता राज्यासाठी अहोरात्र काम करा ना? पण मुख्यमंत्र्यांना सत्ता सिंहासन मिळूनही त्यांना दिवस-रात्र सर्वत्र भाजप दिसतो आहे. मोदी, शहा, फडणवीस, राणे, सोमय्या, चित्रा वाघ हे आपल्या अवती-भोवती फिरत असावेत, असा त्यांना सतत भास होत असावा.

भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे, अशी एक पुडी त्यांनी या सभेत सोडून दिली. म्हणे देवेंद्र फडणवीस यांनी तसे भाषणात म्हटले होते, ही आणखी एक लोणकढी ठोकून दिली. फडणवीस यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे कधी म्हटल्याचे कोणी यापूर्वी ऐकले नव्हते. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी तसे कधी म्हटले नव्हते. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुंबई वेगळी करण्याविषयी कधी संकेतही दिलेले नाहीत. मग भाजपला मुंबई वेगळी करायची आहे याचा ठाकरेंनी कसा काय शोध लावला? नेमकी बीकेसीवरच्या सभेतच अशी थाप ठोकून द्यावी हे त्यांना कसे सुचले? मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील सोळा महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मुंबई वेगळी करण्याचे भाजप मनसुबे रचत आहे, असे खोटे सांगून लोकांची शिवसेनेला मते मिळतील, असे ठाकरेंना वाटत असेल तर ते कुठल्या नंदनवनात वावरत आहेत हे त्यांनीच शोधावे? जनता एवढी मूर्ख नाही आणि ठाकरेंची प्रतिमाही विश्वासार्ह राहिलेली नाही. राज्यातील जनतेने अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापनेचा जनादेश भाजप-शिवसेनेला दिला होता, सर्वाधिक एकशे पाच आमदार हे भाजपचे निवडून आले. मग शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केलेच कसे? शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला आहे. अशा पक्षप्रमुखांच्या खोटारडेपणावर जनता कसा विश्वास ठेवेल? ज्या पक्षाने पंचवीस वर्षे युतीची फळे चाखली, त्याच शिवसेनेला आता भाजप दुष्मन वाटू लागला आहे. भाजपचा चेहरा भेसूर दिसू लागला आहे. ज्यांचा हात हातात घेऊन सत्ता उपभोगली तो पक्ष गाढव वाटू लागला आहे. त्या गाढवाला लाथ मारली, असे ते अभिमानाने सांगत आहेत, ही भाषा मुख्यमंत्रीपदाला मुळीच शोभणारी नाही.

ठाकरे यांच्या बकवास भाषणात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या आणि ओवेसीसुद्धा हिट लिस्टवर दिसले. भाजपच्या नेत्यांना तर ‘खाऊ की गिळू’ अशा पद्धतीने ते भाषा वापरत होते. आमचे हिंदुत्व असा जप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ओवेसी पुत्राने औरंगाबाद येथे येऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण केल्यावरही काहीही करता आले नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले. सत्तेवर असलेले नेते केवळ ओवेसी पुत्राचा निषेध करीत आहेत, पण पोलिसांना त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश या सरकारला देता आले नाहीत. घरातून बाहेरही न पडलेल्या राणा दांपत्यावर याच सरकारने राजद्रोहाचा गुन्हा तप्तरतेने दाखल केला, त्यांना चौदा दिवस जेलमध्ये डांबण्याची मर्दुमकी दाखवली. पण ओवेसीपुढे हे सरकार कसे नांगी टाकते हे बघायला मिळाले. कुविख्यात दाऊद इब्राहिम म्हणे भाजपमध्ये आला तर त्याला भाजपवाले मंत्रीही करतील, अशी भाषा मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने वापरणे लज्जास्पद आहे. दाऊदशी आर्थिक व्यवहार करणारा नेता महिनाभर जेलमध्ये आहे, पण त्याला मंत्रिपदावरून हटविण्याची हिम्मत मुख्यमंत्री दाखवू शकत नाहीत, त्यांना भाजपवर टीका करण्याचा नैतिक अधिकार तरी काय? आपण राज्यातील इंधनाचे कर कमी करायचे नाहीत आणि महागाईवर भाजपला बोला म्हणून सांगायचे हा आणखी दुटप्पीपणा झाला. शिवसेना युतीत पंचवीस वर्षे सडली याचा पुर्नरूच्चार करणे, राज ठाकरे यांना मुन्नाभाई म्हणून हिणवणे, स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता म्हणून प्रश्न विचारणे हे सर्व स्क्रिप्ट आघाडी सरकारच्या कॉमन मिनिमन प्रोग्रॅमचे आहे. काँग्रेसबरोबर जाऊनही आम्ही भगवा सोडला नाही, असे सांगणे म्हणजे ढोंगीपणाचा कळस झाला. अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे व काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द झाले पाहिजे हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण करून दाखवले, त्याच भाजपची कावीळ शिवसेनाप्रमुखांच्या मुख्यमंत्री पुत्राला झाली असेल, तर राज्याचे ते दुर्दैव म्हणावे लागेल.

Recent Posts

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

14 minutes ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

1 hour ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

6 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

7 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

7 hours ago