सीमा दाते
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. आधीच सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. आता विषय आहे तो म्हणजे या निवडणुकीत कोण कोणासोबत जाणार आणि कोण स्वबळावर लढणार. गेले कित्येक दिवस भाजप आणि मनसेची मैत्री समाजमाध्यमांसमोर दिसून येत होती. भाजपच्या मोठ्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटही घेतली होती. त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेची छुपी युती होते की काय अशी चर्चा सुरू होती.
मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेनंतर त्या चर्चेला पूर्णविराम बसला आहे. भाजप आणि मनसेमधून युतीबाबत कोणत्याच नेत्यांनी स्पष्टता दिली नसली तरी राज ठाकरे यांचे भाषण आणि हिंदुत्वाचा मुद्दा पाहता भाजप आणि मनसे एकत्र येईल असेच वाटू लागले. सध्या राज ठाकरे यांनी मुंबईत हिंदुत्वाचे वातावरण तयार केले आहे. त्यानंतर हनुमान चाळिसा पठण आणि नवनीत राणा यांचे आंदोलन यामुळे गेल्या काही दिवसांत राजकारण वेगळ्याच बाजूने गेले आहे. आतापर्यंत भाजप आणि शिवसेना एकत्र युतीत असताना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन लढताना पाहायला मिळाले आहे. मात्र आता भाजप आणि मनसे एकत्र एकाच मुद्द्यावर उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करताना पाहायला मिळाले तर यात आश्चर्य वाटायला नको. शिवसेना महाविकास आघाडीसोबत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला की काय अशी चर्चा सुरू होती आणि याचाच फायदा भाजप आणि मनसेला या आगामी महापालिका निवडणुकीत होणार होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी झालेल्या सभेनंतर शिवसेना हिंदुत्वाच्या बाजूने उभी आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे सध्या मुंबईत महापालिका निवडणुकीला घेऊन राजकीय पक्षांमध्ये गोंधळ निर्माण झालाय की, काय असे वाटते. एकीकडे भाजप-मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा असली तरी दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
सध्या महाविकास आघाडीत सोबत असताना ज्येष्ठ नेते म्हणून महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निर्णय आधी घेतले जातात. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र महापालिका निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आधीच शनिवारी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी हे दाखवून दिले आहे की, आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड होण्याची शक्यता आहे, तर भाजपला मुंबई महापालिकेपासून दूर ठेवायचे असल्यास शिवसेनेला कोणाची तरी मदत लागणार हे निश्चितच आहे. २०१७ मध्ये शिवसेना स्वबळावर लढली होती. त्यावेळी ८४ जागा मिळाल्या होत्या, तर भाजप ८२ जागा निवडून आले होते. मात्र आता जर एकहाती सत्ता महापालिकेवर स्थापन करायची झाल्यास शिवसेनेला १०० हून अधिक आणि भाजपला ही १०० हून अधिक जागा निवडणूक आणणे गरजेचे आहे आणि त्यामुळे कोणत्याही एका पक्षाची मदत दोन्हीही पक्ष म्हणजे शिवसेना आणि भाजपला लागणार आहे.
भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू असल्यामुळे आणि दोघांचे विचार एक असल्यामुळे ते दोघेही एकत्र येऊ शकतात, तर इथे सत्तेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळे १०० हून अधिक जागा निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र दिसू शकतात, तर यात शिवसेना
८० टक्के जागा आणि राष्ट्रवादी २० टक्के जागा असा देखील फॉर्म्युला वापरू शकतो अथवा २०१७ च्या निवडणुकीच्या संख्याबळ नुसार ही जागा ठरवू शकतात. २०१७ नुसार आता शिवसेनेचे संख्याबळ मुंबई महापालिकेत ९९, भाजप ८३, काँग्रेस ३०, राष्ट्रवादी ८, समाजवादी पार्टी ६, मनसे १, एमआयएम २ आहे. येणारी महापालिका निवडणूक ही भाजप आणि शिवसेना हा दोघांसाठी अटीतटीची असणार आहे. त्यामुळे दोन्हीही पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप २०१७ मध्ये काही फरकामुळे महापालिकेवर सत्ता मिळवू शकली नाही. मात्र आता भाजपला ती संधी सोडायची नाही, तर शिवसेनेला गेले ३० वर्षांहून अधिक काळ आपली सत्ता असलेली मुंबईत महापालिका सोडायची नाही. त्यामुळे कोणासोबत ही युती करून आपली सत्ता या दोन्हींही पक्षांना मिळवायची आहेच.