रत्नागिरी, (हिं. स.) :मुंबई -मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसने रत्नागिरी जिल्ह्यात निवसर-आडवलीपासूनचा पुढील प्रवास रविवारी विद्युत इंजिनाने केला. सकाळी रत्नागिरीत दाखल झालेली कोकणकन्या एक्स्प्रेस रत्नागिरीपासून पुढील प्रवासाला निघाली असता निवसर आणि आडवली स्थानकांच्या दरम्यान या गाडीच्या डिझेल इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे तेथेच असलेल्या एका मालगाडीचे विजेचे इंजिन पुढील प्रवासासाठी या गाडीला जोडावे लागले.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे हा मार्ग विजेवरील गाड्या धावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे गेल्या १ मेपासून कोकण रेल्वेमार्ग मार्गावरील दहा गाड्या विद्युत इंजिनसह धावणार होत्या. मात्र काही कारणामुळे हा मुहूर्त साधला गेला नाही. दरम्यान, आज सकाळी कोकणकन्या एक्स्प्रेसचेच इंजिन निवसर ते आडवली दरम्यान बिघडले. याचवेळी या मार्गावरून धावणाऱ्या मालगाडीचे विजेचे इंजिन काढून ते कोकणकन्या एक्स्प्रेसला जोडून गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली.